हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज संपूर्ण देशभरात हनुमान जयंती मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी होत आहे. पहाटेपासूनच विविध हनुमान मंदिरांमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे. महाराष्ट्रात हनुमान मंदिरांची खास परंपरा आहे आणि त्यातही समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या 11 मारुती मंदिरांना (Maruti Temples) विशेष महत्त्व आहे. या मंदिरांचा धार्मिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून मोठा गौरव आहे. तर चला ती कोणती मंदिरे आहेत ? ती कुठे आहेत ? याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेली 11 मारुती मंदिरे –
शिराळा (सांगली) – शके 1576 मध्ये स्थापन. उत्तराभिमुख 7 फुटी दगडी मूर्ती. जागृत देवस्थान म्हणून मान्यता.
मसूर (सातारा , कराड ) – शके 1567 मध्ये स्थापना. 5 फुटी महारुद्र मारुतीची चुन्याची मूर्ती.
शहापूर (सातारा , कराड ) – 6 फुटी चुन्याची मूर्ती. पूर्वाभिमुख. डोक्यावर गोंड्याची टोपी.
माजगाव – एका मोठ्या दगडावर कोरलेली मारुती मूर्ती.
शिंगणवाडी – खडीचा मारुती म्हणून प्रसिद्ध.
चाफळ – राम मंदिराच्या मागे वीर मारुती मूर्ती. येथे दोन मारुती मूर्ती आहेत.
मनपाडळे (कोल्हापूर) – 5 फुटी उत्तराभिमुख साधी सुबक मूर्ती. कुबडीही आहे.
पारगाव (कोल्हापूर) – सर्वात लहान (1.5 फुटी) बाळमारुती. समर्थांच्या झोळीतला मारुती म्हणून ओळख.
पाडळी – वारणा खोऱ्यातील गावात स्थित.
रामलिंग बेट (बहे, सांगली) – 11 गज उंचीची भव्य व विक्राळ मूर्ती. एक आख्यायिका म्हणते की ही मूर्ती पाण्यातून वर काढून समर्थांनी स्थापन केली.
उंब्रज (सातारा) – शके 1571 मध्ये स्थापन. चुना, वाळू आणि तागपासून तयार मूर्ती.
हनुमान उपासना आणि राष्ट्रीय प्रेरणा –
समर्थ रामदास स्वामींनी या अकरा मारुती मंदिरांच्या स्थापनेद्वारे तत्कालीन समाजामध्ये आध्यात्मिक जागृतीबरोबरच राष्ट्रप्रेम, शक्ती आणि शौर्याची प्रेरणा दिली. हनुमान हे रामदास स्वामींच्या दृष्टीने आदर्श सेवक, अचल भक्तीचे प्रतीक आणि अपार बलाचे मूर्तिमंत रूप होते. आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने या मंदिरांमध्ये विशेष पूजा, अभिषेक, हनुमान चालीसा पठण व विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. भाविकांची उत्स्फूर्त गर्दी आणि श्रद्धेचा भाव पाहता, हनुमान भक्तीचा प्रभाव अजूनही तसाच प्रखर आहे. ह्या ऐतिहासिक स्थळांना भेट देणं म्हणजे केवळ एक धार्मिक प्रवास नसून महाराष्ट्राच्या अध्यात्मिक वारशाचा साक्षात्कार घडवणारा अनुभव आहे.