हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एका लग्नसमारंभा दरम्यान, 11 महिलांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उत्तरप्रदेश येथे झाली आहे. यावेळी पोलीस आणि गावकऱ्यांनी जवळपास १५ महिलांची सुटका केली मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तरप्रदेश येथे नौरंगिया शाळेच्या मैदानात एका लग्नाचा कार्यक्रम सुरू होता. बुधवारी या ठिकाणी हळदीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. काही महिला आणि मुली विहिरीवर लावलेल्या जाळीवर उभ्या होत्या. त्याचवेळी हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि काही महिला जाळीवर चढल्याने महिलांच्या वजनाने लोखंडी पातळ जाळी तुटली. त्यामुळे या जाळीवर उभ्या असलेल्या सर्व महिला एकापाठोपाठ एक करून विहिरीत कोसळल्या.
एकूण 13 महिला या विहिरीत कोसळल्या. त्यात दोन मुलींचाही समावेश होता. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. पाण्याने भरलेल्या विहिरीत जीव वाचवण्यासाठी काही महिला शेवटची धडपड करताना दिसत होत्या. मात्र, या महिलांना पाण्यातून बाहेर काढेपर्यंत 11 महिलांचा बुडून मृत्यू झाला. दोन महिला गंभीर असून त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं आहे.