हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागच्या वर्षी भारतात पार पडलेल्या ५० ओव्हरच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत (World Cup 2023) टीम इंडियाला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया कडून पराभूत व्हाव लागलं आणि रोहित सेनेचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. मात्र या वर्ल्डकपचे यजमानपद भूषवल्याने भारताला मात्र तब्बल 11,637 कोटींचा फायदा झाल्याची माहिती आयसीसीने दिली आहे. यात सर्वाधिक फायदा देशातील पर्यटन क्षेत्राला झाला. गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेली ही विश्वचषक स्पर्धा क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठी स्पर्धा ठरली.
ICC चे मुख्य कार्यकारी ज्योफ अल्लार्डिस म्हणाले, ‘ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 ने क्रिकेटची आर्थिक ताकद दाखवून दिली. या स्पर्धेमुळे भारताला 11,637 कोटी रुपयांचा फायदा झाला. यात सर्वाधिक फायदा हा पर्यटन क्षेत्राला झाला. ज्या ज्या शहरात विश्वचषकाचे सामने खेळवण्यात आले त्या सर्वाना मिळून एकूण 7.23 हजार कोटी रुपयांचा फायदा झाला. यात राहणे, फिरणे, जेवण यांचा समावेश होता. कारण मोठ्या संख्यने देशातील आणि परदेशातील क्रिकेटप्रेमींनी वर्ल्डकप सामन्यासाठी हजेरी लावली होती. भारत हा क्रिकेटप्रेमींचा देश आहे हे पुन्हा एकदा यानिमित्ताने स्पष्ट झालं. टूर्नामेंट, तसेच हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील इतर संस्थांच्या थेट सहभागातून या वर्ल्डकप वेळी 48,000 हून अधिक नोकऱ्या निर्माण झाल्या. त्यामुळे ICC इव्हेंट केवळ क्रिकेट चाहत्यांना खुश करत नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेत सुद्धा महत्त्वपूर्ण योगदान देतात हे सिद्ध झालं आहे.
अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत भारतातील तब्बल 12 लाख 50 हजार प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये जाऊन सामने बघितले. यातील ७५ टक्के प्रेक्षक असे होते जे प्रथमच वर्ल्डकप सामना बघायला गेले होते. जे बाहेरील क्रिकेट चाहते होते त्यातील 55 टक्के क्रिकेटप्रेमी यापूर्वी सुद्धा भारतात सामने पाहायला आले होते तर 19 टक्के आंतरराष्ट्रीय चाहत्यांनी विश्वचषकाच्या निमित्ताने पहिल्यांदाच भारताला भेट दिली होती.