कराड | य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या त्रिपक्षीय समितीच्या करारानुसार 1 डिसेंबर 2021 पासून 12 टक्के वेतनवाढ लागू केल्याची माहिती चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली. कारखान्यात सन 2021-22 या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या 5 लाख 1 व्या साखर पोतीपूजन समारंभात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर संचालक लिंबाजी पाटील, जितेंद्र पाटील, दयानंद पाटील, धोंडिराम जाधव, गुणवंतराव पाटील, निवासराव थोरात, संजय पाटील, बाबासो शिंदे, संभाजीराव पाटील, शिवाजी पाटील, जे. डी. मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, वैभव जाखले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून कृष्णा कारखान्याला उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांचा संचालक मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. चेअरमन डॉ. भोसले म्हणाले, कृष्णा कारखान्यात नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब आपण करत आलो आहोत. ऊस नोंदणीसाठी मोबाईल ॲप, ई करार यासारखे नाविन्यपूर्ण प्रयोग पहिल्यांदा कृष्णा कारखान्यात करण्यात आले. त्याचपद्धतीने ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना जी.पी.एस. प्रणालीचा वापरही इथून पुढे करण्यात येत आहे. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना व कारखान्यास होणार आहे. कारखान्याच्या यशस्वी वाटचालीत ‘कृष्णा’च्या कामगारांचे मोठे योगदान आहे. त्यांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध आहे. कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी स्वागत व प्रास्तविक केले. सेक्रेटरी मुकेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. संचालक जितेंद्र पाटील यांनी आभार मानले. यावेळी पैलवान आनंदराव मोहिते, एम. के. कापूरकर, बाळासाहेब पाटील, जनरल मॅनेजर टेक्निकल प्रसाद राक्षे यांच्यासह शेतकरी सभासद, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सन्मान दातृत्वाचा!
काही महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे ऊसतोडणी मजुरांचे अतोनात नुकसान झाले होते. या मजुरांना जेवण व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणाऱ्या शेतकऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा सन्मान चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये हेमंत धर्मे, शंकर निकम, पांडुरंग निकम, दीपक पाटील, समीर पाटील, शिवाजी थोरात, पृथ्वीराज काकडे, महादेव मोहिते, दिलीप गोरे, सुनील पाटील, हर्षवर्धन मोहिते, सदाशिव भोसले, अभिजित पाटील, विजय पाटील, अरुण पाटील, सच्चिदानंद साटपे यांचा समावेश आहे.