औरंगाबाद – विलीनीकरणाच्या प्रमुख मागणीसाठी संपावर असलेल्या कर्मचार्यांवर एसटी प्रशासनाने कारवाईचे सत्र सुरूच ठेवले आहे. आतापर्यंत 21 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. काल त्यात आणखी भर पडली असून, पुन्हा 12 जणांवर बडतर्फीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे एकूण बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या 33 झाली आहे. तर काल गंगापूर, वैजापूर आणि सोयगाव या गावातील जवळपास 50 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.
औरंगाबाद एसटी प्रशासनाच्या वतीने काल दिवसभरात ग्रामीण भागासह अन्य शहरात जवळपास 108 बसेस रस्त्यावर धावल्या. या बसेसने 337 फेऱ्या करून 5 हजार 895 प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी सोडले. यामध्ये पुणे मार्गावर 15 तर नाशिक मार्गावर 7 खासगी शिवशाही बसेस चालवण्यात आल्या.
एसटी कर्मचाऱ्यांचा संपा बाबत आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणी कडे संपकरी कर्मचाऱ्यांसह प्रवासी तसेच प्रशासनाचे लक्ष लागले आहे. या सुनावणीनंतर संपकरी कर्मचारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, जे कामावर रुजू होतील त्यांच्यावर कारवाई न करता त्यांना कर्तव्यावर हजर होण्याचे संकेत देण्यात येणार आहे.