Monday, January 30, 2023

धक्कादायक ! 12 वर्षांच्या मोठ्या भावाने धाकट्या भावाची गळा चिरून केली हत्या

- Advertisement -

सातारा : हॅलो महाराष्ट्र – सातारा जिल्ह्यामधील नायगाव या ठिकाणी एका 8 वर्षांच्या मुलाची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणातील आरोपीला शिरवळ पोलिसांनी अवघ्या 4 तासांमध्ये ताब्यात घेतले. या 8 वर्षांच्या लहान चिमुरड्याचा खून 12 वर्षीय मोठ्या भावाने केला आहे. आरोपीने आपण लहान भावाची हत्या केल्याचे कबुल केले आहे. त्याने हा खून का केला याचे कारण ऐकून मुलाच्या आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. आई आणि वडील दोघेही लहान भावावर प्रेम करतात. धाकटा भाऊ सतत माझ्यावर लक्ष ठेवून असतो. काही झाले तरी सगळे माझ्यावरच येते. याच रागातून मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली आहे. हत्येचे कारण ऐकून पोलीस देखील हैराण झाले आहेत.

मृत मुलाचे आई वडील हे मुळचे कर्नाटकमधील आहेत. सध्या खंडाळा तालुक्यातील नायगाव याठिकाणी एका शेतीवर मजूर म्हणून काम करतात. आई आणि वडील दोघंही दिवसभर शेतात कामाला जातात. तर दोन्ही भाऊ हे घरीच असतात. हे दोघे भाऊ घरात किंवा आसपासच्या परिसरात खेळात असतात. सोमवारीसुद्धा आईवडील नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी गेले होते. तेव्हासुद्धा मुले घराच्या परिसरात खेळत होती. त्यानंतर जेव्हा आईवडील घरी परतले तेव्हा त्यांना फक्त मोठा मुलगाचं दिसला. त्यानंतर आईवडिलांनी त्याला लहान भाऊ कुठे आहे? असे विचारले असता त्याने मला माहित नाही, असे उत्तर दिले. यानंतर घरच्यांनी त्याचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला पण कुठेच त्याचा पत्ता लागला नाही.

- Advertisement -

खूप शोधाशोध केल्यानंतर पपईच्या बागेत लहान भाऊ रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्याचं आई वडिलांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती फलटण पोलिसांना आणि एलसीबीच्या पथकाला समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी तपासणी केली असता त्यांना हत्येसाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड त्यांना भेटली. यानंतर पोलिसांना त्याच्या मोठ्या भावावर संशय आला तेव्हा पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.