हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (New India Co-operative Bank) आर्थिक गैरव्यवहाराचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. या बँकेतील माजी महाव्यवस्थापक हितेश प्रवीणचंद मेहता (Hitesh Premachand Mehta) यांच्यावर 122 कोटी रुपये चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) सोपवण्यात आली आहे. तर पोलिसांकडून देखील तपास सुरू आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लादल्यानंतर हजारो ठेवीदार आपली रक्कम परत मिळेल की नाही, याबाबत चिंतेत पडले आहेत. या बँकेत तब्बल 1.3 लाख ठेवीदारांची खाती आहेत. त्यातील 90 टक्क्यांहून अधिक खात्यांमध्ये 5 लाखांपेक्षा जास्त रक्कम आहे. आरबीआयच्या कारवाईमुळे मोठ्या संख्येने ग्राहक बँकेच्या शाखांमध्ये धाव घेत आहेत.
महत्वाचे म्हणजे, हितेश मेहता यांच्यावर दादर आणि गोरेगाव शाखेची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र आता पदाचा गैरवापर करून या शाखांच्या खात्यातून त्यांनी तब्बल 122 कोटी रुपये परस्पर काढल्याचा आरोप लावण्यात आला आहे. बँकेच्या मुख्य लेखाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बँकेच्या अंतर्गत लेखा परीक्षणात या अफरातफरीचा खुलासा झाला. त्यानंतर दादर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानंतर, या गैरव्यवहारात हितेश मेहतासह आणखी एका व्यक्तीचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. तसेच, न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील काही खात्यांची तपासणी केल्यानंतर अपेक्षित आर्थिक माहिती हाती न लागल्यामुळे आरबीआयने या बँकेवर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता ठेवीदार चिंतेत पडले आहेत.




