औरंगाबाद – शहरातील सात छायाचित्रकारांचे महागडे कॅमेरे घेऊन अलिबाग येथे प्रीवेडिंग व्हिडीओ शूटिंग करण्यासाठी गेलेल्या युवकाच्या विरोधात 14 लाख 55 हजार 640 रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात सोमवारी दाखल झाला. विशेष म्हणजे, ज्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला, तो युवक बेपत्ता असल्याची तक्रार एक दिवस आधी पुंडलिकनगर ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.
मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात विशाल वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, योगेश रतन गोत्राळ (वय 27, रा. गजानननगर, पुंडलिकनगर) यास अलिबाग येथे लग्नाच्या व्हिडीओ शूटिंगची मोठी ऑर्डर मिळाली होती. ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी त्याने छायाचित्रकार विशाल वाघमारे यांच्या 1 लाख 35 हजार रुपयांच्या कॅमेऱ्यासह गजानन कचरू वेळंजकर यांचा 3 लाख 40 हजाराचा, सूरजकुमार मनोज इंगळे यांचा 4 लाख 4 हजारांचा, सोहेल शहा हुसेन शहा यांचा 1 लाख 67 हजार 640, श्रेयस लक्ष्मीकांत बुजाडे यांचा 79 हजारांचा, गजेंद्र बाबूराव मते यांचा 1 लाख 60 हजारांचा, राहुल विजय पवार यांचा 1 लाख 70 हजार रुपयांचा कॅमेरा दीड ते तीन हजार रुपये प्रति दिवस भाडेतत्त्वावर घेऊन गेला होता.
24 डिसेंबरला नेलेले हे कॅमेरे 1 जानेवारी रोजी परत आणून देण्याची बोली होती. मात्र 3 जानेवारीपर्यंत 14 लाख 55 हजार 640 रुपये किमतीचे कॅमेरे परत आणून देण्यात आले नाहीत. आरोपी योगेशसह फिर्यादी आणि इतर सर्वजण एकमेकांचे मित्र आहेत. योगेशवर गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती निरीक्षक ब्रम्हा गिरी यांनी दिली.