औरंगाबाद | प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या लक्सरीबस बस, मालवाहतुक टँकर आणि ट्रकचा विचित्र पद्धतीने भीषण अपघात झाला. या अपघातात बस मधील 15 जण जखमी झाले आहेत. जखमीतील पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावरील भेंडाळा फाटा चौक येथे घडली.
संजय राजेंद्र परदेशी (रा.अहमदनगर), गणेश रमेश महाजन (रा.यवतमाळ), मारुती आढाव (रा.यवतमाळ), डॉ.संतोष कृष्णा पाटील (रा.औरंगाबाद), संतोष जालिंदर मेहेत्रे (रा.अहेमदनगर) अशी अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, (जि. जे.06,एव्ही 4949) या क्रमांकाचा टँकर रात्री औरंगाबादकडून भेंडाळा फाट्याकडे जात होते. तर (एन.एल.01 बी 1530) या क्रमांकाची लॅक्सरी बस प्रवासी घेऊन औरंगाबादच्या दिशेने येत होती. दरम्यान टँकरने भेंडलाफाटा चौकातून वळण घेण्यासाठी गाडी आडवी केली त्यामुळे लॅक्सरी बस चालकांचे नियंत्रण सुटल्याने बस आणि टँकर चा सामोरा समोर अपघात झाला.
यानंतर या अपघात ग्रस्त वाहनाला अजून इतर वाहने धडकली.या भीषण अपघात बस आणि टँकरचा चुराडा झाला. तर बसमधील सुमारे 15 प्रवासी जखमी झाले. या सर्व जखमींना पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने रात्री गंगापूर रुग्णालयात हलविले. मात्र त्यामधील पाच जण गंभीर असल्याने त्यांना औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघात प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.पुढील तपास हवलादर संजय मोरे करीत आहेत.