सातारा | चार महिन्यांपूर्वी एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सातारा व कोल्हापूर याठिकाणी नेऊन अल्पवयीन मुलाने हे कृत्य केले. याप्रकरणी अत्याचाराच्या आरोपावरून संशयित मुलावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित मुलगी आपल्या आई-वडिलांसमवेत सध्या साताऱ्यात राहते. संशयित अल्पवयीन मुलाशी पीडित मुलीची ओळख होती. या ओळखीतून त्याने मुलीला ऑगस्ट महिन्यात आमिष दाखवून मुलीला पळवून नेले. या प्रकारानंतर मुलीच्या वडिलांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
पोलिसांनी संबंधित मुला व मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघेही सापडले नव्हते. अखेर गुरूवारी दि. 2 डिसेंबरला पोलिसांना हे दोघे कोल्हापूर परिसरात सापडले. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही साताऱ्यात आणले. पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. तसेच तिच्याकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याने सातारा व कोल्हापूर येथे अत्याचार केल्याचे सांगितले. याबाबत अधिक तपास सहायक पोलीस अधीक्षक ऑचल दलाल याकरीत आहेत.