रायगड । महाड येथे झालेल्या पाच मजली निवासी इमारत दुर्घटनेला अठरा तास लोटून गेल्यानंतर याच्या ढिगाऱ्याखालून कोण बचावले असतील की नाही, याबाबत शंका असतानाच दुपारी १.१५ वा महंमद बांगी या सहा वर्षाचा मुलाला सुखरुप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. आत्तापर्यंत या ढिगाऱ्याखालून दोन मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. सय्यद अमिर समिर (वय ४५) आणि नविद अंतुले (वय ३५) अशी मृतांची नावे आहेत. तर २५ जणांना या ढिगाऱ्याखालून सोमवारी रात्री उशीरा बाहेर काढण्यात यश आले, अशी माहिती रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिली होती.
महाड दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ४ लाखांची मदत जाहीर होणार आहे. जखमींना २५ हजार ते १ लाखाची मदत झाली आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहेत. दरम्यान, फारुक काझी आणि युनूस शेख या दोन्ही बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिल्डरव्यतिरिक्त महाड शहर पोलीस स्थानकात आर्किटेक्टवरही गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.
आठ महिने ते एका वर्षाच्या आतच या इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं होतं. मुळात हे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचं होतं अशीच माहिती समोर येत आहे. त्यामुळं हा मनुष्यवधच आहे अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे. सुरुवातीपासूनच इमारतीच्या बांधकामाच्या तक्रारी असल्याची धक्कादायक माहिती स्थानिक आणि प्रत्यक्षदर्शी तसंच इमारतीत दुर्घटनेतून बचावलेल्या रहिवाशांनी दिली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”