19 वर्षीय गुन्हेगाराची डोक्यात कुऱ्हाड घालुन निर्घृणपणे हत्या

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – गोंदिया शहरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 19 वर्षीय तरुणाची कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली आहे. मृत तरुणदेखील गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयित आरोपीना अटक केली आहे. रोहित उर्फ डायमंड डोंगरे असे या मृत तरुणाचे नाव आहे.

मृत रोहित डोगरे हा गोंदिया शहराच्या अंगूर बगीचा भागात राहत होता. रविवारी रात्रीपासून तो बेपत्ता झाला होता. त्यानंतर आज सकाळी घराजवळ असलेल्या एका मोकळ्या मैदानात रोहितचा मृतदेह आढळून आला. त्याची डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. धक्कादायक म्हणजे, वार केल्यानंतर हल्लेखोर डोक्यात कुऱ्हाड तशीच ठेवून घटनास्थळावरून पसार झाले होते.

आज सकाळी मैदानात फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांना रोहितचा मृतदेह आढळून आला. यानंतर या लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर तो मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. मृत रोहित डोंगरे हा गुन्हेगारी प्रवृतीचा तरुण होता. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल होते. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. रामनगर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.