व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पहिली ते नववीच्या परीक्षा 15 एप्रिलनंतर

औरंगाबाद – पहिली ते नववीच्या मार्चअखेर होणाऱ्या परीक्षा 15 एप्रिल नंतर घेण्यात येतील असा ठराव मराठवाडा मुख्याध्यापक संघाने मांडला. 15 एप्रिल पर्यंत शिक्षकांच्या 100 टक्के उपस्थितीत पूर्णवेळ शाळा भरून अध्ययनक्षती भरून काढावी. त्यासाठी 30 एप्रिल पर्यंतचा प्रत्यक्ष शिक्षणाचा सूक्ष्म कृती आराखडा शाळांना, डाएट शिक्षण विभागाकडून देण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांनी दिली.

सर्वच व्यवस्थापनाच्या शाळेत 30 एप्रिल पर्यंत प्रत्यक्ष शिकवण्याचे नियोजन यापूर्वीच शिक्षण विभाग, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेकडून करण्यात आले होते. अध्ययनक्षती भरून काढण्यासाठी शाळा आणि शिक्षकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी दरवर्षी मार्च अखेर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होऊन पुढील 20 दिवस निकालाची प्रक्रिया सुरू असते. मात्र, विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी 15 एप्रिल पर्यंत प्रत्यक्ष शिक्षण व त्यानंतर परीक्षा घेण्याचे नियोजन करण्याचा ठराव मराठवाडा मुख्याध्यापक संघाने मांडला.

पूर्णवेळ शाळा भरवा –
सर्व शाळात शंभर टक्के शिक्षकांची उपस्थिती व पूर्णवेळ शाळा भरतात की नाही, याची पडताळणी करून सूचना न मानणाऱ्या शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावावी, अशा सूचना शिक्षणाधिकारी देशमुख यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना झालेल्या बैठकीत दिल्या.