Thursday, October 6, 2022

Buy now

सातारा जिल्ह्यात भरारी पथकाकडून 2 कोटीचे बोगस बियाणे जप्त

सातारा | राज्यात यंदा खरीप हंगामाचे पीक क्षेत्र वाढणार असल्याने राज्य शासन पहिल्यापासूनच सतर्क झाले आहे. सातारा जिल्ह्यात खरीप हंगामात खते व बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी 12 भरारी नेमण्यात आलेली आहेत. या पथकांद्वारे आतापर्यंत खते, बि-बियाणे, औषधे अशा 1 हजार 10 दुकानांची तपासणी करण्यात आली आहे. दुकानातील रेकॉर्ड व्यवस्थीत न ठेवल्याप्रकरणी 12 खते दुकाने व 2 किटकनाशक दुकानांचा विक्री परवाना निलंबीत करण्यात आला आहे. दरम्यान, 2 कोटीचे बियाणे जप्त करण्यात आले असून या बियाणांची तपासणी सुरू आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 10 खते बियाणे व कृषि औषधांच्या दुकानांची तपासणी पथकांनी केली आहे. त्यामध्ये 108 बियाणांचे, 77 खतांचे व 39 किटकनाशकांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. बियाणांचे व किटकनाशकांचे नमुने शासकीय प्रयोगशाळा पुणे व खताचे नमुने शासकीय प्रयोगशाळा कोल्हापूर येथे पाठवण्यात आले होते. त्यापैकी बियाणांचे 7, खताचे 9 व किटकनाशकांचे 5 नमुने अप्रमाणीत असल्याचे आढळून आले आहेत. संबंधित कंपन्यांना व खत, बियाणे व किटकनाशक विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच बोगस बियाणे साताऱ्यात सापडले असून 1 हजार 22 क्विंटल बियाणे कृषी विभागाने जप्त केले आहे. त्यांची किंमत 2 कोटी 4 लाख 40 हजार रुपये आहे. जिल्ह्यातील 12 खत विक्रेते व 2 किटकनाशक विक्रेत्यांचा विक्री परवाना निलंबीत करण्यात आला आहे. तर एक परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी, वजने मापे निरीक्षक, कृषी अधिकारी पंचायत तर जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी, कृषी उपसंचालक, मोहीम अधिकारी, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक, वजने मापे निरीक्षकांचा पथकात समावेश राहणार आहे. ही 12 भरारी पथके कृषी निगडीत असणारी खते, बि-बियाणे, किटकनाशक दुकानांची तपासणी करणार असल्याची माहीती जि. प. चे कृषी विकास अधिकारी विजय माईनकर यांनी दिली.