देवदर्शनाहून परतणाऱ्या तवेरा- इंडिका गाडीचा भीषण अपघात : दोनजण जागीच ठार 6 जखमी

सातारा | लोणंद-फलटण रस्त्यावर सुरवडीनजीक इंडिका व तवेरा या दोन चारचाकी वाहनांचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये इंडिका कारमधील दोघेजण जागीच ठार तर 6 जण जखमी झाले आहेत.  या अपघातात शुभम केवटे (रा. संगमनेर, जि. अहमदनगर), सचिन ऊर्फ गोट्या भारत काळेल (रा. वळई, ता. माण) या दोघांचा मृत्यू झाला असून दैवत शामराव काळेल (रा. वळई, ता. माण) हे जखमी झाले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फलटण-लोणंद रोडवर सुरवडी नजीक जगताप वस्तीजवळ लोणंदकडून फलटणकडे निघालेली इंडिका कार (क्र.एमएच 14 एफसी1104) व फलटण कडून लोणंद कडे निघालेली तवेरा (क्र. एमएच 14 ई-5053) वाहनांचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणारी इंडिंका कारच्या चालकाचा ताबा सुटल्याने दुसर्‍या लेनमधून समोरून येणार्‍या तवेरा गाडीवर आदळली. या अपघातात तवेरामधील पाच ते सहाजण जखमी झाले आहेत. ही तवेरा देवदर्शन करून लोणंदच्या दिशेने जात होती.

अपघातानंतर लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल वायकर, पीएसआय गणेश माने व पोलीस कर्मचार्‍यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करून वाहतुक सुरळीत केली. पोलिस पाटील सोमनाथ जगताप यांनी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. अपघातस्थळी पोलीस उपअधिक्षक तानाजी बरडे यांनी भेट दिली. अपघातातील मृत्यू झालेल्या दोघांचे मृतदेह लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले होते. या अपघाताची नोंद लोणंद पोलीस स्टेशनमध्ये करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.