व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

सोलापुरात ‘मुळशी पॅटर्न’ची पुनरावृत्ती; गुंडांकडून ऑन कॅमेरा खंडणी वसुली

बार्शी : हॅलो महाराष्ट्र – सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या ठिकाणी खंडणीची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दोन खंडणीखोरांनी एका व्यापाऱ्याला लुटले आहे. या आरोपींनी खडी क्रॅशरवर जाऊन व्यापाऱ्याला धक्काबुक्की करत त्याच्याकडून 50 हजार रुपये रुपये उकळले आहेत. हा सगळा धक्कादायक प्रकार पीडित व्यापाऱ्याच्या जवळच्या एका कर्मचाऱ्याने धाडस करून आपल्या मोबाइलमध्ये शूट केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या प्रकरणी पीडित व्यापाऱ्याने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, पीडित व्यापाऱ्याचा खडी क्रॅशरचा व्यवसाय आहे. दोन खंडणीखोरांनी या व्यापाऱ्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली होती. यावेळी व्यापाऱ्याने खंडणी देण्यास विरोध केला. यानंतर या आरोपींनी या व्यापाऱ्याला धक्काबुक्की केली. आरोपींनी धमकी देत या व्यापाऱ्याकडून 50 हजार रुपये वसूल केले आहेत. तसेच ‘दर महिन्याला 50 हजार रुपये द्यावे लागतील. तू पैसे कसे देत नाही, ते बघून घेतो’ अशी धमकी देखील आरोपींनी दिल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा सगळा प्रकार पीडित व्यापाऱ्याच्या एका कर्मचाऱ्यांनं मोठ्या हिमतीने आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, आरोपी कशाप्रकारे व्यापाऱ्याला धमकावत आहेत.आरोपींनी यावेळी व्यापाऱ्याच्या कॉलरला पकडून त्यांना धक्काबुक्कीसुद्धा केली आहे. तर अजून एका खंडणीखोराने हातात घातक वस्तू घेऊन मारण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने या धक्काबुक्कीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. यावेळी आरोपींने माझ्या पाठीशी चार-पाच पत्रकार आहेत. त्यामुळे तू माझं काही करू शकत नाही, अशी धमकी देखील दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस आरोपींवर काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.