२ घरे , १ म्हैस आगीत जळून खाक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी 

ठोंबरेवाडी ता.सातारा येथील नुने ते गवडी या रस्त्यानजीक असलेल्या माळरानावरील बाबर यांची दोन घरे जळून खाक झाली आहेत. यामध्ये घरातील संसारोपयोगी वस्तू,धान्य,दागिने व म्हैस हे सर्वजण आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने जळून खाक झाली आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे सुमारे तीस लाखांचे नुकसान होऊन मोठी हानी झाली आहे.

ठोंबरेवाडी येथील शेतकरी बबन राऊ बाबर व सुदाम राऊ बाबर (दोघेही रा. ठोंबरेवाडी) यांच्या दोन्ही घराला व त्याशेजारील असलेल्या जनावरांच्या शेडला गुरुवारी पहाटे 12.30 च्या सुमारास अचानक आग लागली. म्हैशींनी आरडाओरडा केल्याने घरातील माणसे जागे होऊन बाहेर पडली. त्वरित या घटनेची खबर पोलिसांना देण्यात आली. सातारा तालुका पोलीस अग्निशमन दलाचा बंब घेऊन घटनास्थळी आग विझवण्यासाठी दाखल झाले.

अग्निशमन दल व ठोंबरेवाडी ग्रामस्थ यांच्या शर्तीच्या प्रयत्नाने
आग विझवण्यात आली. परंतु बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरे व त्या शेजारील असलेले जनावरांचे शेड आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. दरम्यान या मधील मालमत्ता व म्हैशी जळून खाक झाली.
तालुका पोलिसांनी ग्रामस्थांच्या सहाय्याने आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. परंतु या ठिकाणी अग्नितांडव झाल्याने घरातील सर्व संसार उपयोगी वस्तू, धान्य, दागिने व त्या शेजारील असलेल्या शेडमधील दोन म्हैशी व जनावरांचा चारा जळून खाक झाला. बाबर यांनी प्रतिकूल परिस्थितीतून उभ्या केलेली दोन घरे व कष्टातून जमवलेले धान्य अशी एकूण मिळून 30 लाख रुपयांची मालमत्ताचे नुकसान झाले आहे.

घरातील 10 पोती ज्वारी,1 पोते हरभरा,4 पोती शेंग, ट्रॉलीभर कांदे, 2 पोती भात, घरातील सुमारे 2.5 लाख रुपये व 5 तोळे दागिने,कपडे,भांडी,मोबाईल व त्या शेजारी असलेल्या शेडमधील 2 म्हैशी,10 कोंबड्या, जनावरांचा चारा व लाकडे असे एकूण मिळून 30 लाखांचे जळून नुकसान झाले आहे. संबंधित शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने बाबर कुटुंबीय हवालदिल होऊन भयभीत झाले आहे. या घटनेची खबर लागताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.सामान्य शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन त्यांच्यावर दुःखाचा डोंगर पसरला आहे.

दोन्ही भावांची प्रतिकूल परिस्थिती असल्याने ते शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते. रात्री अचानक आग लागून निवारा, अन्न व वस्त्रच हरपल्याने जगणे अवघड झाले आहे. आगीने आर्थिक मोठे नुकसान झाल्याने कुटुंबियांमधील महिलांमध्ये अश्रू अनावर झाले होते. या वृद्ध कुटुंबीयांना आयुष्यातील शेवटच्या वयातही जगणे अवघड होणार आहे. याबाबत प्रशासन कोणती दखल घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या कुटुंबियांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे.

Leave a Comment