Monday, January 30, 2023

मध्यरात्री रायगडमध्ये फायरिंगचा थरार; आरोपी पत्ता विचारायला थांबले अन्….

- Advertisement -

माणगाव : हॅलो महाराष्ट्र – रायगड जिल्ह्यातील माणगाव याठिकाणी मध्यरात्री एक खळबळजनक घटना घडली आहे. यामध्ये दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी एका औषध विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. या आरोपींनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने या औषध विक्रेत्याला थांबवून जीवघेणा हल्ला केला आहे. ही घटना इतकी अचानक घडली की, संबंधित तरुणाला स्वत:चे संरक्षण करायलाही वेळ मिळाला नाही. या हल्ल्यामध्ये हा औषध विक्रेता गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबाराची ही थरारक घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात दोन अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडले नेमके ?
शुभम जयस्वाल असे या हल्ल्यात जखमी झालेल्या 24 वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो औषध विक्रीचे काम करतो. घटनेच्या दिवशी शुभम जयस्वाल दुकान बंद करून आपल्या घरी जात होता. यावेळी पल्सर मोटर सायकलवरून आलेल्या दोन अज्ञातांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करत त्याला थांबवले. यानंतर दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या एकाने बेसावध असलेल्या शुभमच्या पोटावर पिस्तुल रोखून त्याच्यावर गोळी झाडली. या हल्ल्यात शुभम गंभीर जखमी झाला.

- Advertisement -

हि घटना माणगावमधील कचेरी रस्त्यावर घडली आहे. हि घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात दोन अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी नेमक्या कोणत्या कारणातून हा प्राणघातक हल्ला केला? याची कोणतीही माहिती अजून पोलिसांना मिळालेली नाही. माणगाव पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.