अजित पवारांच्या नावाखाली 200 कोटींचा घोटाळा; रोहित पवारांचा सनसनाटी आरोप

Ajit Pawar Rohit Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नावाखाली तब्बल २०० कोटींचा भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या भ्रष्ट्राचार संचालक मंडळाने केला असून या घोटाळ्यात अधिकारी सामील आहेत, तसेच मंत्रालयापर्यंत हफ्ते दिले जात असल्याचा आरोप रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे. रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत हा आरोप केलाय. त्यांच्या या आरोपामुळे पुण्याच्या राजकारणात सनसनाटी निर्माण झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली नाही, तर १५ दिवसांत मोठं आंदोलन करू असा इशाराही रोहित पवार यांनी सरकारला दिला आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

पुणे बाजार समितीत ४ हजार बोगस परवाने देऊन शेतकर्‍यांना लुटले जात आहे. शेतकर्‍यांशी घेणेदेणे नसलेल्यांना फुलबाजारातील गाळ्यांचे वाटप करत घोटाळा केला आहे. बाजारात अतिक्रमण करत केस कापणार्‍यांपासून गुटखा विक्री करणार्‍यांना जागांचे वाटप केले. पार्किंगच्या नावाखाली लूट, सुरक्षारक्षकांच्या नियुक्तीत भ्रष्टाचार आणि स्वच्छता कंत्राटात गैरव्यवहार असे अनेक गैरप्रकार सुरू आहेत अधिकृत पावती फक्त दहा रुपयांची दिली जाते, मात्र प्रत्यक्षात २०० ते ३०० रुपयांपर्यंत रक्कम वसूल केले जात असून यामध्ये संचालकांचा सहभाग आहे असं रोहित पवार यांनी म्हंटल.

ते पुढे म्हणाले, रोजंदारी सेवकांच्या कायम नियुक्तीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. माथाडी कायद्याचा गैरवापर केला जात आहे. या सर्व प्रकारामुळे शेतकरी, वाहतूकदार आणि कामगार वर्ग प्रचंड अडचणीत सापडला आहे. शासनाने याप्रकरणाची तातडीने चौकशी करून जबाबदार संचालकांवर कठोर कारवाई करावी.

रोहित पवार यांनी यावेळी थेट अजित पवारांचे नाव घेतलं. अजित पवार कडक नेते असून चुकीच्या कामांना ते पाठीशी घालणार नाहीत, अशी आमची भावना आहे. मात्र, बाजार समितीचे सर्व संचालक अजित पवार यांनी सांगितले असे सांगत त्यांच्या नावावर घोटाळे करत आहेत. यावर स्वतः अजितदादांनी आता खुलासा करावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली. तसेच जर सरकारने पुढील १५ दिवसांत यावर कोणतीही कारवाई केली नाही, तर शेतकऱ्यांच्या सोबत मोठं आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.