हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उत्तर प्रदेशमधील बस्ती जिल्ह्यात एक अजब प्रकार घडला आहे. बरतनिया गावात राहणाऱ्या एका बांधकाम मजुराच्या बँक खात्यावर तब्बल 200 कोटी रुपये जमा झाले आहेत.. यामुळे त्याला आयकर विभागाकडून नोटीसही बजावण्यात आली आहे. आपल्या खात्यावर 200 कोटी कसे जमा झाले? किंवा ते कोणी केले? हे या मजूराला देखील माहिती नाही. परंतु झटक्यात कोट्यधीश बनल्यामुळे हा बांधकाम मजूर सोशल मीडियावर चर्चेचा भाग बनला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, बस्ती जिल्ह्यातील लालगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरतनिया गावात शिव प्रसाद निषाद राहतात. ते एक बांधकाम मजूर असून दगड फोडायचे काम करतात. मात्र अचानक त्यांच्या खात्यावर 2 अब्ज 21 कोटी 30 लाख रुपये एवढी रक्कम जमा झाली आहे. मुख्य म्हणजे, खात्यावर एवढे पैसे जमा होताच आयकर विभागाकडून निषाद यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच त्यांना, बँक खात्यातील व्यवहाराचा तपशील देण्यास देखील सांगितले आहे. या सर्व प्रकारामुळे सध्या निषाद गावात चांगलेच चर्चेत आले आहे. मात्र यामुळे निषाद यांच्या कुटुंबाचा ताण वाढला आहे.
याबाबत माहिती देताना निषाद यांनी म्हणले आहे की, मी एक बांधकाम मजूर आहे. ज्या बँक खात्यात 2 अब्ज 21 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली, ते बँक खाते माझेच आहे. मात्र, ही रक्कम कोणी आणि कशी जमा केली, गेल्या काही दिवसांपूर्वीच माझे पॅन कार्ड हरवले होते. मला वाटते की, या कार्डचा वापर करूनच कोणी तरी खात्यावर पैसे टाकले असावे. माझ्या खात्यावर रक्कम झाली आहे, परंतु ती कोणी पाठवली आणि ते कसे आले मला माहित नाही. दरम्यान, एका कामगाराच्या खात्यावर एवढी मोठी रक्कम जमा झाल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सध्या ही एवढी रक्कम एका कामगाराच्या खात्यावर कशी जमा झाली याचा तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपेंद्र नाथ चौधरी करीत आहेत. तसेच, आयकर विभागाकडून देखील या सर्व प्रकाराची चौकशी सुरू करण्यात आली आहे.