साताऱ्यात 221 विदेशी दारूच्या बाटल्या जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बुधवार नाका ते मोळाचा ओढा रस्त्यार दुचाकीवरुन चोरुन हजारो रुपये किंमतीच्या 221 विदेशी दारुच्या बाटल्या घेवून जाणार्‍याला पोलिसांनी पकडले. विनोद विश्वास जाधव (वय 42, रा.वाघेश्वर ता.जावली) असे संशयिताचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही कारवाई शुक्रवारी दुपारी करण्यात आली आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरट्या दारुची वाहतुक होत असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण (डीबी) मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला असता दुपारी एकजण पांढर्‍या रंगाच्या ऍक्टीव्हा दुचाकीवरुन संशयास्पदरीत्या निघाला होता. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी दुचाकीस्वाराला अडवले असता त्याच्याकडे मोठ्या दोन बॅगा दिसल्या. पोलिसांनी त्यामध्ये काय आहे? असे विचारताच संशयिताने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पकडून त्याची झडती घेतली असता बॅगांमध्ये दारुच्या बाटल्या निदर्शनास आल्या.

पोलिसांनी दुचाकीस्वाराला ताब्यात घेवून दुचाकी मुद्देमालासह पोलिस ठाण्यात आणली. मुद्देमालाचा पंचनामा केला असता 84 हजार 834 रुपये किंमतीच्या विदेशी दारुच्या 221 बाटल्या होत्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या व संशयितावर गुन्हा दाखल केला. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून शाहूपुरी पोलिसांची सलग कारवाई सुरु असून दुसर्‍यांदा दारुचा मोठा सापडला आहे. पोनि संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हसन तडवी, लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार यांनी कारवाईत सहभाग घेतला.