आई मला माफ कर म्हणत नवविवाहितेने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमधील सिडको या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 24 वर्षीय नवविवाहितेनं इमारतीच्या टेरेसवरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर विवाहितेने आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

प्रियांका पगारे असे आत्महत्या करणाऱ्या 24 वर्षीय नवविवाहितेचे नाव आहे. ती सिडको परिसरातील खटवडनगर येथील कृष्णा अपार्टमेंटमधील रहिवासी आहे. प्रियंकाने रविवारी सकाळी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

अंबड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली. ‘आई, मला माफ कर, माझ्या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरू नये’ असे प्रियंकाने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. मात्र प्रियंकाने नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अजून समजू शकले नाही. यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून घटनेच्या पुढील तपासाला सुरुवात केली आहे.