अनैतिक संबंधातुन तरुणाची दगडाने ठेचून हत्या

हिंगोली : हॅलो महाराष्ट्र – हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील सावळी याठिकाणी एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. हि घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी आरोपीविरोधात औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
सचिन धुळबाजी धवसे असे मृत तरुणाचे नाव असून तो औंढा नागनाथ तालुक्यातील सावळी येथील रहिवासी आहे. घटनेच्या आधल्या दिवशी मृत सचिन आपल्या घरातून गायब झाला होता. घरच्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, पण त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी डिग्रस कऱ्हाळे शिवारातील एका शेतात त्याचा मृतदेह आढळून आला. यानंतर स्थानिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले. श्वान पथकाने घटनास्थळापासून अर्धा किमी अंतरापर्यंत मारेकऱ्यांचा माग काढला. पण मारेकरी काही सापडले नाही. त्यामुळे पोलिसांनी स्थानिक नागरिक आणि मृत सचिनच्या जवळच्या मित्रांची चौकशी केली. यावेळी पोलिसांना सचिनच्या अनैतिक संबंधाची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता पोलिसांना दोन आरोपींची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना मनमाड रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले. औंढा नागनाथ पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.