औरंगाबाद । शहरात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण सेवेबरोबरच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून २६ स्मार्ट सिटीबस उपलब्ध करुन दिल्या आहेत. आता या बस रुग्णवाहिकेची जागा भरुन काढत आहेत.
स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन व महापालिकेला सिटीबस उपलब्ध करुन दिलेल्या असतानाही या दोन्हीही संस्थांनी अद्याप बसचे भाडे दिलेले नाही. सुमारे दीड ते दोन कोटी रुपये महापालिका व जिल्हा प्रशासनाकडे थकीत असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बस उपलब्ध करुन देण्याचा निर्णय स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने घेतला आहे.
शहरात कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून निर्माण झाली. मार्चमध्ये रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला. त्यामुळे रोज आढळून येणाऱ्या कोरोनाबाधितांना कोवीड केअर सेंटरपर्यंत नेण्यासाठी किंवा विविध दवाखान्यांपर्यंत ने आण करण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने पुन्हा एकदा २६ सिटीबस उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यापैकी दोन बस जिल्हा परिषदेसाठी तर, २४ बस महापालिकेसाठी वापरल्या जात आहे. २६ बसवर २६ चालक नियुक्त केले आहेत, अशी माहिती स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सिटीबस विभागाचे उपव्यवस्थापक सिद्धार्थ बनसोड यांनी दिली.
कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी देण्यात आलेल्या सिटीबसचे रोज सॅनिटायझेशन केले जाते. दररोज वैद्यकीय कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी ठराविक वेळेत बस दिल्या जातात, त्याशिवाय रुग्णांच्या गरजेनुसारदेखील बस उपलब्ध करुन दिल्या जात आहेत.