सातारा | आर्थिक व्यवहारात फसवणूक झाल्याच्या नैराश्यातून एका 26 वर्षीय युवकाने विषारी औषध पिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. युवकाच्या आत्महत्येस कारणीभूत असल्या प्रकरणी रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह त्याच्या भावास पोलिसांनी अटक केली आहे. जितेंद्र रविंद्र शिंदे (वय- 26, रा. पाटखळ) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तर रयत क्रांती शेतकरी संघटनेचा पदाधिकारी शंकर शिंदे व त्याचा भाऊ अमर शिंदे (दोघे रा. पाटखळ ता. सातारा) अशी संशयित आरोपीची नावे आहेत. याप्रकरणी रविंद्र शिंदे (वय ५८, रा.पाटखळ) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृत जितेंद्र शिंदे यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जितेंद्र शिंदे, शंकर शिंदे व अमर शिंदे यांनी 3 वर्षापूर्वी भागीदारीमध्ये जलयुक्त शिवार योजनेत खटाव येथे बंधारे बांधण्याचे काम घेतले होते. संबंधित कामासाठी 6 लाख रुपयांचा खर्च झाला होता. त्यातील 3 लाख रुपये संशयित आरोपी शंकर व अमर शिंदे या भावांकडून जितेंद्र शिंदे याला येणे होते.
तीन लाख रुपयांपैकी केवळ 50 हजार रुपये संशयितांनी दिले. उर्वरीत 2 लाख 50 हजार रुपये येणे होते. जितेंद्र शिंदे राहिलेली रक्कम दोन्ही भावांना वेळोवेळी मागत होता. मात्र संशयित आरोपींनी ‘आमचेच नुकसान झाले आहे. पैसे देणार नाही. तुम्हाला कायद्याने कोणाकडून पैसे घ्यायचे ते घ्या,’ असे म्हणत दमदाटी करत होते. पैसे मिळत नसल्याने जितेंद्र शिंदे याला नैराश्य आले होते. यातूनच त्याने दि. 22 जानेवारी रोजी सायंकाळी गावात विषारी औषध प्राशन केले. या घटनेनंतर त्याला उपचारासाठी सिव्हील व पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दि. 30 रोजी जितेंद्र याचा उपचारावेळी मृत्यू झाला.
या घटनेनंतर वडिलांनी पोलिस ठाण्यात झालेल्या घटनेची माहिती देवून तक्रार असल्याचे सांगितले. त्यावरुन पोलिसांनी शंकर व अमर शिंदे या भावांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयात असता त्यांना हजर केले पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.