प्रवाशाचे 3 किलो चांदीचे पार्सल रिक्षाचालकाने केले परत; पोलिसांकडून कौतुक

औरंगाबाद |  एकाच दिवशी दोन छेडछाडीच्या घटना घडल्याने रिक्षाचालकाची प्रतिमा खालावल्याचे दिसत होते मात्र एका रिक्षाचालकाने रिक्षामध्ये प्रवाशाचे पार्सल विसरल्याचे कळाल्यावर रिक्षा थेट क्रांती चौक पोलीस ठाण्यात नेत पार्सलची बॅग पोलिसांच्या स्वाधीन केली आहे. पोलिसांनी ती बॅग उघडून बघितल्यावर त्यात 3 किलो चांदीचा रथ होता. यामुळे नागरिकांमधून रिक्षाचालकाचे कौतुक केले जात आहे. मुकुंदवाडी संजयनगर येथील रहिवासी रिक्षाचालक परशुराम भंडारे हा सेंट्रल बसस्थानक, बाबा पेट्रोल पंप, सिडको -मुकुंदवाडी या परिसरात रिक्षा चालवतो.

पु. ना. गाडगीळ यांची एक ऑर्डर असल्याने खामगाव येथून राधा प्रश्न कुरिअरचा एक कर्मचारी तीन किलो चांदीचे पार्सल घेऊन औरंगाबाद येथील सिडको बसस्थानकावरून मध्यवर्ती बसस्थानकावर परशुराम भंडारे यांच्या रिक्षा आला. आणि पुण्याला जाण्यासाठी बस स्थानकात घाईगडबडीत गेला. यामध्ये त्याचे पार्सल रिक्षातच विसरले.
रिक्षातून प्रवासी गेल्यानंतर काही वेळानंतर परशुराम यांच्या लक्षात आले प्रवासी पार्सल घ्यायला येईल म्हणून रिक्षाचालकाने खूप वेळ वाट बघितली.

मात्र प्रवासी काही आला नाही मग रिक्षाचालकाने थेट क्रांती चौक पोलिस ठाणे गाठले आणि सहाय्यक फौजदार संदीप राव मोरे यांना रिक्षा चालक भेटला व रिक्षात एका प्रवासाचे पार्सल पसरल्याचे सांगितले. मोरे यांनी तपासणी करून पार्सल फोडले व त्यात पु. ना. गाडगीळ व खामगाव येथील व्यापाऱ्यांचे मोबाईल क्रमांक व पत्ता होता. पोलीस अधिकारी यांनी खामगाव येथे फोन करून त्या व्यापाऱ्याला पार्सल याविषयी माहिती दिली. तोपर्यंत पार्सल घेऊन आलेल्या व्यक्ती रिक्षा शोधत होता. आपले पार्सल क्रांती चौक पोलिस ठाण्यात असल्याचे कळाल्यावर कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. आणि रिक्षाचालक परशुराम देवीदास भंडारे यांचे सर्वांनी कौतुक केले. असेही चांगले काम करणारे रिक्षाचालक शहरात असल्याचे शहरवासीयांना प्रत्यय आला आहे.