सातारा | फलटण तालुक्यातील आदर्की येथे दुचाकीवरील अज्ञाताने एस. टी. बस थांब्यासमोर चारचाकी गाडी उभी असताना त्याची काच फोडून 3 लाख 20 हजाराची रोकड, लॅपटॉपसह बॅग चोरुन नेल्याची घटना घडली. शनिवारी दुपारी 3 च्या दरम्यान घटना घडली. याबाबत अमोल बाळासाहेब जाधव यांनी फिर्याद लोणंद पोलिस ठाण्यात दिली आहे.
याबाबत लोणंद पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अमोल बाळासाहेब जाधव (सध्या रा. नवी मुंबई) हे आपल्या मूळगावी आदर्की येथे आले होते. त्यांनी स्थानिक संस्थेचे कर्ज भरण्यासाठी फलटण येथून एका बँकेतून पैसे घेवून आदर्की येथे आले होते.
या दरम्यान, स्टॅण्डवरील एका हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी गेले असता दोन दुचाकीवरील अज्ञाताने रॉडने गाडीची काच फोडून त्यामधील 2 लाख 30 हजार रुपये व लॅपटॉप असणारी बॅग घेवून काही क्षणातच पोबारा केला. जाताना डाव्या बाजूच्या टायरची हवा सोडून दिली. ही घटना गावच्या आठवडा बाजार दिवशीच घडल्याने या घटनेने खळबळ उडाली आहे.
या घटनेनंतर आदर्की बुद्रुक दूरक्षेत्राचे सपोनि गणेश माने व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. अज्ञात चोरटे सापडण्यासाठी विविध ठिकाणी पोलिस पथकांना सूचना करण्यात आल्या आहेत. लोणंद पोलिसांनी अज्ञाताविरूध्द गुन्हा नोंद दाखल केला आहे.