कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
जगभरातील मुस्लिम बांधवांकडून पवित्र अशा रमजान महिन्यात उपवास म्हणजेच रोजे केले जातात. उन्हाळयाच्या या दिवसात हा रोजा धरणे म्हणजे काही सोप्प काम नाही. दिवसभर काहीही न खाता, आणि पाणी न पिता केला जाणारा रमजानचा रोजा बऱ्याच वेळा मोठ्यांनाही निभवत नाही मात्र कराड मधील एका 3 वर्षाच्या चिमुकलीने रमजानचा हा पवित्र रोजा धरला आणि तो निभावला सुद्धा…. तिच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
होय, अमयरा तौफिक इनामदार असं या 3 वर्षाच्या लहान मुलीचे नाव असून ती कराड येथील गुरुवार पेठेतील दर्गा मोहल्ला परिसरात राहते. अमयराने एक दिवसाचा रमजानचा उपवास धरला. पहाटेपासून ते रात्री सात वाजेपर्यंत काहीही न खाता पिता तिने हा रोजा निभावला आणि लहान असली म्हणून काय झाल, अशक्य असं जगात काहीच नसत हेच सर्वाना दाखवून दिले.
वास्तविक पाहता, शक्यतो 6 ते 7 वर्षांच्या मुलांनी रोजा धरण्याचे प्रकार काही ठिकाणी पाहायला मिळतात मात्र अवघ्या 3 वर्षाच्या आमायराने रोजा धरून तो यशस्वी करून दाखवला. हा रोजा बऱ्याच वेळा मोठ्यांना सुद्धा निभावत नाही मात्र तीन वर्षाच्या आमायराने घरातल्या मोठ्यांचे बघून रोजा धरला आणि तो निभावला सुद्धा आहे. या छोट्या अमायराचे सर्वत्र कौतुक होत आहे.