हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दारूचा घोट चक्क जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना तामिळनाडू येथे घडली आहे. तामिळनाडू येथील कल्लाकुरिची जिल्ह्यात विषारी दारू (Poisonous Liquor) प्यायल्यानं 32 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 60 पेक्षा जास्त जणांची प्रकृती गंभीर आहे. जिल्हाधिकारी एमएस प्रशांत यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. सदर लोकांवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहे, मात्र मृतांसाजी संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी पोलिसांनी 49 वर्षीय दारू तस्कर के गोविंदराज उर्फ कन्नूकुट्टी याला अवैध दारू विक्री केल्याप्रकरणी अटक केली असून त्याच्याकडून 200 लिटरहून अधिक दारू जप्त करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री, कल्लाकुरिची शहर आणि आसपासच्या भागातील डझनभर लोकांनी करुणापुरममध्ये तस्करांनी विकलेली अवैध दारू प्यायली होती. घरी आल्यावर, त्यापैकी अनेकांना चक्कर येणे, डोकेदुखी, उलट्या, मळमळ, पोटदुखी आणि डोळ्यात जळजळ असा प्रकारचा त्रास सुरु झाल. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात आणि कल्लाकुरीची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नेले, मात्र यावेळी 10 जणांचा मृत्यू झाला.
#WATCH | Puducherry: 15 people admitted to JIPMER (Jawaharlal Institute of Postgraduate Medical Education & Research) last night after alleged consumption of the liquor in Kallakurichi district area of Tamil Nadu. pic.twitter.com/oQYC1nr6g9
— ANI (@ANI) June 20, 2024
दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आणि ते थांबवण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगितलं. त्यांनी ट्विट करत म्हंटल, कल्लाकुरीची येथे भेसळयुक्त दारू प्यायल्याने लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून मला धक्का बसला आणि दु:ख झाले. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या लोकांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. शिवाय ते रोखण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या लोकांची माहिती जनतेने दिल्यास त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली जाईल. समाजाला बरबाद करणाऱ्या अशा गुन्ह्यांना कठोरतेने ठेचले जाईल.