मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी महत्वाची सूचना आहे. माहीम खाडी पुलाच्या पुनर्बांधणीसाठी पश्चिम रेल्वेने मोठा निर्णय घेतला असून, ११ आणि १२ एप्रिलच्या रात्री होणाऱ्या मेगा ब्लॉकमुळे एकूण ५१९ रेल्वे गाड्यांवर परिणाम होणार आहे. यामध्ये ३३४ गाड्या पूर्णतः रद्द करण्यात आल्या असून, १८५ गाड्या अर्ध्या मार्गावरच थांबवण्यात येणार आहेत.
कोणत्या कालावधीत रेल्वे सेवा ठप्प?
- पहिला मेगा ब्लॉक: ११ एप्रिल रात्री ११:०० ते १२ एप्रिल सकाळी ८:३०
- दुसरा मेगा ब्लॉक: १२ एप्रिल रात्री ११:३० ते १३ एप्रिल सकाळी ९:००
या दोन्ही वेळेत मुंबईतील महत्त्वाच्या लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्या थांबणार असून, माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान रेल्वे वाहतूक पूर्णतः बंद राहील.
गाड्या कुठे थांबतील
या कालावधीत काही गाड्यांना महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहिम आणि खार रोड या स्थानकांवरच थांबवण्यात येईल. त्यामुळे रोज प्रवास करणाऱ्या लोकांनी आपल्या वेळापत्रकात बदल करण्याची तयारी ठेवावी. पश्चिम रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, या कालावधीत प्रवासाचे नियोजन काळजीपूर्वक करावे, रेल्वेच्या वेबसाइट किंवा स्थानकांवरील नोटीसमधून गाड्यांच्या रद्द झालेल्या/अर्ध्या मार्गावर असलेल्या यादीची खातरजमा करावी.
मुंबईतील महत्त्वाच्या पुलाच्या पुनर्बांधणीमुळे ह्या तात्पुरत्या अडचणी निर्माण होत असल्या तरी, दीर्घकाळासाठी ही पायाभूत सुधारणा अत्यंत आवश्यक आहे. प्रवाशांनी संयम ठेवून आणि योग्य माहिती घेत प्रवास करावा, हाच प्रशासनाचा आग्रह आहे.