पालडोह जिल्हा परिषद शाळेची अनोखी प्रेमकहाणी शिक्षक आर.यु.परतेकी यांच्या अदम्य जिद्दीची कहाणी..
चंद्रपूर प्रतिनिधी
प्रेमात काहीही घडू शकते असे म्हणतात. असाच प्रकार जिवती तालुक्यात एका शिक्षकाच्या बाबतीत घडला आहे. आंतरजातीय प्रेमाला घरच्यांनी आडकाठी आणली पण, खचून न जाता आयुष्यातील संपूर्ण दिवस विद्यार्थ्यांसाठी घालविण्याचा संकल्प या बहाद्दराने कृतीत उतरविला. मागील पाच वर्षांपासून ही शाळा ३६५ दिवस सुरू आहे. ही प्रेरणादायी घटना आहे जिवती तालुक्यातील पालडोह जिल्हा परिषद शाळेची. रविवार असो अथवा कोणताही सण-उत्सव, मुले आनंदाने शाळेत येतात. याकरिता गावकरीही मोलाची साथ देत आहेत. पालडोह येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आर. यु. परतेकी हे २००६ रोजी शिक्षक पदावर रूजू झाले. शिक्षक परतेकी हे यवतमाळ जिल्ह्यातील रहिवाशी. चंद्रपूरमधील एका मुलीशी त्यांचे प्रेम जुळले.
लग्नासाठी दोघांनीही घरी प्रस्ताव मांडला पण, जात वेगळी असल्याने दोघांना घरून विरोध झाला. त्याचवेळी परतेकी यांनी घर सोडून टेकामांडवा येथे राहण्याचे ठरवले. याचवेळी त्यांनी निर्धार केला की वर्षातील ३६५ दिवस शाळे मुलांसोबत घालवणार. हा निर्धार त्यांनी कृतीतही उतरविला. पाच वर्षांपासून ही शाळा ३६५ दिवस भरत आहे. पहाटे चार तर रात्री आठ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांचा नित्यक्रम सुरू असतो. सकाळी साडेचार वाजता गावाबाहेर जाऊन योगा, व्यायाम व खेळ शिकविले जातात. शिकविलेल्या विषयावर दररोज नऊ वाजता विद्यार्थ्यांची चाचणी घेतली जाते. रविवारी वर्ग १ ते ४ व ५ ते ८ या दोन गटात स्पर्धा परीक्षांवर मार्गदर्शन केलं जातं. शाळेत १२३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविण्यासाठी राबविणाऱ्या परतेकी यांनी नोंदणी पद्धतीनं विवाह केला. अध्यापनाचे कार्य आता जोमाने सुरू असून त्यांच्या नवरत्न स्पर्धेत शाळेला दरवर्षी पुरस्कार मिळतात.
शाळेला जागा विकत घेण्यासाठी गावकऱ्यांनी २ लाख लोकवर्गणी गोळा केली. कृतीशील उपक्रमांमुळे राज्यातून अनेक शाळेतील विद्यार्थी पालडोह शाळेला भेटी देतात. त्यांच्या स्वागतासाठी गावकरी पुढे येतात. रंगरंगोटी व विविध झाडांनी शाळेचा परिसर देखणा झाला.शाळेत नर्सरी सुरू करण्याचा परतेकी यांनी बोलून दाखविला. शाळेसाठी मैदान नसल्याने तत्कालिन शिक्षक शेंडे व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा प्रश्न दूर केला. पालडोह येथील जि. प. शाळा १०० टक्के प्रगत आहे. पण, भौतिक सुविधा नाहीत. सुरक्षाभिंत, पाणी, वाढीव वर्ग खोल्यांचा अभाव आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली.