Tuesday, February 7, 2023

‘स्मार्ट सिटी’तील 37 हजार ग्राहक अंधारात

- Advertisement -

औरंगाबाद – चिकलठाणा येथील महापारेषणच्या 132 के.व्ही. उपकेंद्रात काल दुपारी 4 वाजेच्या सुमारास बिघाड झाला आणि महावितरणची माडा कॉलनी तसेच एन-4 ही 33 के.व्ही.ची दोन्ही उपकेंद्रे बंद पडली. परिणामी चिकलठाणा, मुकुंदवाडी, एन-4, गारखेडा, आकाशवाणी, पुंडलिक नगर इत्यादी भागातील तब्बल 37 हजार वीज ग्राहकांचा पुरवठा खंडित झाला. दुपारी बंद पडलेल्या पुरवठा सायंकाळपर्यंत सुरळीत झाला नव्हता. त्यामुळे मनस्ताप सहन करत नागरिकांना रात्री 9 वाजेपर्यंत अंधारात राहावे लागले.

चिकलठाण्यातील महापारेषणच्या 132 केव्ही उपकेंद्रातून महावितरणच्या म्हाडा कॉलनी 33 के.व्ही. उपकेंद्र आणि एन-4 येथील 33 के.व्ही. उपकेंद्राला वीज पुरवठा होतो. महापारेषणच्या या उपकेंद्रातील ब्रेकर मध्ये काल दुपारी 4 वाजेच्या सुमारास अचानक बिघाड झाला. त्यामुळे महावितरणच्या दोन्ही उपकेंद्रात तून शहरातील विविध भागांना होणारा वीजपुरवठा बंद पडला. महापारेषणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीसाठी उपकेंद्रावर धाव घेतली. महावितरणचे कर्मचारीही तेथे पोहोचले. बिघाड शोधण्यात आणि दुरुस्तीत एक एक तास पुढे जात होता, तसा नागरिकांमध्ये संताप वाढत होता. महावितरणच्या कार्यालयात नागरिकांचे फोनवर फोन येत होते. मात्र, रात्री 8 वाजेपर्यंत बहुतांश भागातील वीज पुरवठा सुरळीत झालेला नव्हता.

- Advertisement -

दुरुस्ती सुरू असल्याची माहिती महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी दिली. विजेअभावी अनेक व्यापाऱ्यांचा व्यवसाय बुडाला. महावितरणने पर्यायी यंत्रणेद्वारे रात्री नऊ वाजता वीज पुरवठा सुरळीत केला. यामुळे शहरातील एन-4, एन-3, एन-2, मुकुंदवाडी, संजय नगर म्हाडा कॉलनी, चिकलठाणा, रामनगर, गारखेडा, हनुमान नगर, न्याय नगर, हायकोर्ट परिसर, सेव्हन हिल, आकाशवाणी परिसरातील काही भागातील वीज गुल झाली होती.