सातारा जिल्ह्याचा 565 कोटी 88 लाखाच्या आराखड्यास मंजूरी : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत सातारा जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) साठी सन 2022-23 साठीच्या कमाल नियतव्यय मर्यादेनुसार रु. 314 कोटी 42 लक्षच्या आराखड्यास मान्यता प्रदान करण्यात आली तसेच, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम अंतर्गत रु. 79 कोटी 83 लक्ष आणि आदिवासी घटक कार्यक्रम बाह्य क्षेत्रसाठी रु. 1 कोटी 63 लक्षच्या प्रारूप आराखड्यास मान्यता प्रदान करण्यात आली. अशा एकूण सातारा जिल्ह्याच्या रु. 395 कोटी 88 लक्षच्या तसेच 170 कोटी वाढीव निधीसह 565 कोटी 88 लक्ष रुपयाच्या प्रारुप आराखड्यास मान्यता प्रदान करण्यात आली.

मंत्री बाळासाहेब पाटील म्हणले, राज्यस्तरावरील बैठक 21 जानेवारीला होत आहे. अर्थमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आराखड्यात वाढ करण्याचा निर्णय झाला. बैठकीत चर्चा होत असताना अलीकडच्या काळात कोरोनाची रूग्णसंख्या वाढत आहे. त्यासंदर्भात आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात सध्या असलेली बेडची व आॅक्सिजन बेडची परिस्थिती तसेच व्हेटींलेटरची माहिती घेण्यात आली.

सध्या रूग्णसंख्य़ा वाढत असली तरी अॅडमिट होणाऱ्याची संख्या अगदीच कमी आहे. सातारा जिल्ह्यात फलटण आणि कराड तालुक्यात रूग्णसंख्या वाढत आहे. तेव्हा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी अशी विनंती मी माध्यमांच्या माध्यमातून करत असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.