व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

एकाच बाईकवरून प्रवास करणाऱ्या 4 मित्रांचा ‘या’ प्रकारे झाला दुर्दैवी अंत

संकेश्वर : हॅलो महाराष्ट्र – संकेश्वर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या सर्व्हिस रोडवरून एकाच दुचाकीने प्रवास करणाऱ्या चार मित्रांचा अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे. हे चौघेजण काही कामानिमित्त निपाणीला गेले होते. निपाणीहून परत येत असताना हा दुर्दैवी अपघात घडला आहे. वेगात बाईक चालवत असताना बाईक घसरून हा दुर्दैवी अपघात घडला आहे. यामध्ये चारही मित्रांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेची माहिती मिळताच मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या दुर्घटेत तिघांचा जागीच तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

बसवराज अर्जुन माळी, प्रवीण कल्लापा सनदी, मेहबूब सय्यद शेगडी आणि मलिकजान जमादार असे या अपघातात मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. यामधील बसवराज अर्जुन माळी, प्रवीण कल्लापा सनदी, मेहबूब सय्यद शेगडी हे संकेश्वर येथील अनंत विद्यानगर परिसरातील रहिवासी होते तर मलिकजान जमादार हा बेळगाव शहरातील खंजर गल्ली परिसरातील रहिवासी होता. तसेच मृत मेहबूब आणि मलिकजान हे दोघं मामे भाऊ होते. मलिकजान हा काही दिवसांपूर्वी बेळगावहून संकेश्वरला आपल्या नातेवाईकांकडे आला होता.

घटनेच्या दिवशी रात्री बसवराज, प्रवीण, मेहबूब आणि मलिकजान चौघेही एकाच दुचाकीने काही कामानिमित्त निपाणीला गेले होते. तेथील काम आटोपल्यानंतर चौघेही पुन्हा एकाच दुचाकीने संकेश्वरला येत होते. यादरम्यान संकेश्वर येथील पर्वतराव यांच्या पेट्रोल पंपाजवळून जात असताना त्यांची दुचाकी अचानक घसरली. बाईकचा वेग जास्त असल्याने सर्वजण उडून रस्त्यावर पडले तर काहीजण दुचाकीसह फरफटत गेले.

यामध्ये डोक्याला मार लागल्यामुळे बसवराज, प्रवीण आणि मेहबूब यांचा जागीच मृत्यू झाला. तर मलिकजान हा सर्वात पाठीमागे बसल्याने तो बाजूला उडून पडला होता. मात्र त्याला गंभीर दुखापत झाली होती. या घटनेची माहिती मिळताच या तरुणांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. मलिकजान याला बेळगावच्या सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले मात्र त्याचा देखील उपचारादरम्यान अखेर मृत्यू झाला. या 4 मित्रांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.