पालघर साधू मॉब लिंचिंगप्रकरणी सीआयडीकडून ४ हजार ९५५ पानांचं आरोपपत्र दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पालघर । पालघर मॉब लिंचिंगप्रकरणी सीआयडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरची हत्येप्रकरणी सीआयडीकडून कोर्टात ४९५५ पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. सुरतकडे निघालेल्या दोन साधू व त्यांच्या ड्रायव्हरची पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे जमावाकडून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.

एप्रिल महिन्याच्या १६ तारखेला गडचिंचले गावात जमावानं दरोडेखोर समजून दोन साधूंसह त्यांच्या ड्रायव्हरची लाठ्याकाठ्या व दगडानं ठेचून हत्या केली होती. या हत्येचे पडसाद देशभरात उमटले होते. विरोधकांनी महाराष्ट्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचाही प्रयत्न झाला होता. हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणीही करण्यात आली होती. राज्य सरकारनं सीयआडीकडं प्रकरणाचा तपास सोपवला होता. सीयआडीकडून एएनआयला देण्यात आलेल्या माहितीनुसार, “पोलीस उपअधीक्षक आणि तपास अधिकारी विजय पवार यांनी डहाणू कोर्टात १२६ आरोपींविरोधात ४९५५ पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे”.

पालघर मॉब लिंचिंग प्रकरणात पोलिसांनी तब्बल ८०८ जणांची चौकशी केली असून ११८ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. हे प्राथमिक आरोपपत्र असून चौकशी सुरूच राहणार आहे. लवकरच पुरवणी आरोपपत्रही दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. आतापर्यंत या प्रकरणात १५४ जणांना अटक करण्यात आली असून ११ अल्पवयीनांना ताब्यात घेतलं आहे. यापैकी कोणालाही जामीन मंजूर करण्यात आलेला नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment