औरंगाबाद : कोरोनाची तिसरी लाट लहान बालकांसाठी धोकादायक ठरणार असल्याचा दावा तज्ञ डॉक्टरांकडून केला जात आहे. त्यातच आता न्यूमोनियामूळे औरंगाबाद जिल्हात 40 बालकांचा मृत्यू झाला आहे. घसा खवखवणे, खोकला, हलका ताप, नाकात कफ जमा होणे, अतिसार, कमी भूक लागणे, थकवा, शरीरात कमी ऊर्जा जाणवणे, हे या आजाराचे लक्षणे आहेत.
गेल्या वर्षभरामध्ये जिल्ह्यात 171 बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यामध्ये औरंगाबाद आणि पैठण या तालुक्यात मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. यामुळे न्यूमोनिया या आजारापासून बालकांना वाचवण्यासाठी लसीकरण मोहिमेत पीसीबी लसीचा समावेश करण्यात आला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात दरवर्षी अंदाजे 40 ते 44 हजार बालकांचा जन्म होतो. या सर्व बालकांना एक वर्षापर्यंत पीसीबी लसीचे 3 डोस देण्यात येणार आहेत. सर्व आरोग्य केंद्रांमध्ये ही लस उपलब्ध राहणार असून यामुळे बालकांचे न्यूमोनियामूळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण टाळण्यात येईल अशी माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी दिली.