औरंगाबाद – मागील वर्षी होणारे 41 वे मराठवाडा साहित्य संमेलन कोरोनाच्या प्रभावामुळे स्थगित करावे लागले होते. नंतर बराच काळ वाट पाहून अखेर ते रद्द करण्यात आले होते. मागील वर्षी ते नांदेड जिल्यातील देगलूर येथे होणार होते. आता 41 वे मराठवाडा साहित्य संमेलन 25 व 26 सप्टेंबर 2021 रोजी औरंगाबाद येथे आयोजित करण्याचे ठरले आहे.
मराठवाड्यातील साहित्यप्रेमी तरुण प्राध्यापकांनी एकत्र येऊन लोकसंवाद फाउंडेशन या त्यांच्या संस्थेच्या वतीने या संमेलनासाठी निमंत्रण दिले होते. त्यांचे हे निमंत्रण मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत स्वीकारण्यात आले. काल साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील व इतर पदाधिकाऱ्यांशी लोकसंवाद फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजेश करपे त्यांचे सहकारी डॉ. राम चव्हाण, डॉ. रामचंद्र काळुंखे, डॉ. गणेश मोहिते, डॉ. हंसराज जाधव, डॉ. रविकुमार सावंत, जिजा शिंदे आणि राम शिनगारे यांनी संमेलनाच्या आयोजनासंबंधी समक्ष चर्चा केली.
आज मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी या संमेलनाची घोषणा करताना संमेलनाच्या आयोजनाची माहिती दिली. यावेळी परिषदेचे उपाध्यक्ष किरण सगर, कार्यवाह दादा गोरे, कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे आणि कार्यकारिणीचे सदस्य डॉक्टर रामचंद्र काळुंके उपस्थित होते.