सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासित ४३ वर्षीय महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने ही ४३ वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. ताज्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या आता १९ वर पोहोचली असून यातील ९ रुग्ण एकट्या कराड तालुक्यात आहेत.
आता सातारा जिल्ह्यात १४ रुग्ण कोविड बाधित असून आत्ता पर्यंत 3 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर २ जणांचा मृत्यू झाला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 5, कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 27, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 4, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 8 व फलटण येथील 11 असे एकूण 55 रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे मृत झालेल्या 5 महिन्याच्या बालकाचा अहवाल निगेटिव्ह असल्याचेही कळविण्यात आले आहे. तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासातील 13 वर्षीय मुलाचा अहवाल अनिर्णित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यलय, पुणे यांनी कळविले आहे.
दरम्यान, दि. २२ एप्रिल रोजी रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे बाधीत रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून 10 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला WhatsApp ला Join व्हा आणि Facebook पेज Like करा