कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेल्या ५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सदर पाच नागरिक कोरोना (कोविड-19) बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. यामुळे आता कराडकरांची चिंता वाढली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, आज पोझिटिव्ह आलेले पाचही रुग्ण कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले होते. त्याच्या घशातील स्वाॅगाचे नमुने पुणे येथे चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. आज त्यांचा अहवाल पोझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे. ताज्या आकडेवारीनुसार जिल्यात आत्तापर्यंत २६ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यातील अर्ध्याहून अधिक म्हणजे १६ रुग्ण हे एकट्या कराड तालुक्यात असल्याने प्रशासनाकडून अधिक खबरदारी घेतली जात आहे.
दरम्यान, आता सातारा जिल्ह्यात २६ रुग्ण कोविड बाधित असून आता पर्यंत 3 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 24 एप्रिल रोजी रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 23 अनुमानितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.