हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बऱ्याच काळापासून कोट्यवधी बँक कर्मचारी आठवड्यात 5 दिवस काम करण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. हि मागणी अंमलात आली आणि जर दोन शनिवारी सुट्टी दिली गेली, तर बँक कर्मचाऱ्यांना रोज 40 मिनिटे जास्त काम करावे लागणार आहे. या विषयावर बँक कर्मचारी संघटना, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि सरकारी अधिकाऱ्यांमध्ये अनेकदा चर्चा झाली आहे. या प्रस्तावावर डिसेंबरमध्ये निर्णय होण्याची संभाव्यता दर्शवली आहे.
बँक कर्मचाऱ्यांची मागणी
सध्या देशभरातील बँका प्रत्येक रविवारी आणि प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बंद असतात. बाकी शनिवारी बँका उघड्या असतात. पण आता बँक कर्मचारी संघटनांनी सोमवारी ते शुक्रवारीच काम करावे आणि प्रत्येक शनिवार रविवार सुट्टी असावी, अशी मागणी केली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना सध्याच्या 6 सुट्ट्यांऐवजी 8 सुट्ट्या मिळतील. इंडियन बँक असोसिएशन (IBA) आणि कर्मचारी संघटनांमध्ये या प्रस्तावावर सहमती झाली आहे.
सरकारचा निर्णय महत्वाचा
जर सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली तर बँकिंगच्या वेळेत 40 मिनिटांची वाढ होऊ शकते. त्यामुळे बँका सकाळी 9:45 वाजता उघडतील आणि सायंकाळी 5:30 वाजता बंद होतील. सध्या अनेक बँका सकाळी 10 वाजता उघडतात आणि ग्राहकांसाठी व्यवहार सायंकाळी 4 वाजेपर्यंतच होतात. जर पाच दिवस बँकेचे काम सुरु राहील असा निर्णय झाला , तर 5 दिवसांच्या कामामुळे ग्राहक सेवेला कोणताही फटका बसणार नाही असे सांगण्यात आले आहे. मात्र हा नियम लागू करण्यासाठी वित्त मंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेची मंजुरी आवश्यक आहे.
AIBOC चा आंदोलनाचा इशारा
डिसेंबरपासून बँकांचा 5 दिवस वर्किंग आठवडा सुरू होण्याची शक्यता कमी दिसत आहे . ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशन (AIBOC) ने सरकारच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे. AIBOC चे महासचिव रूपम रॉय यांनी सांगितले की सरकारकडून याबाबत कोणताही स्पष्ट माहिती मिळालेला नाही. त्यांनी यासंदर्भात पंतप्रधान कार्यालय आणि सरकारला लवकर निर्णय घेण्याची विनंती केली आहे.