“50 खोके एकदम ओके”; भर लग्नमंडपात संतोष बांगर यांच्यापुढे घोषणाबाजी

santosh bangar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे यांची साथ सोडून अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांकडून “५० खोके एकदम ओके” अशा घोषणाबाजी चांगल्याच गाजल्या. यापूर्वी अधिवेशन सुरू असताना सुद्धा विधानसभेच्या पायरीवर उभं राहून विरोधकांनी 50 खोके, एकदम ओकेचा नारा देत शिंदे गटाच्या आमदारांना डिवचलं होते. आता तर लग्नाच्या मंडपातच शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर याना पाहताच कार्यकर्त्यांनी “५० खोके एकदम ओके” अशा घोषणा दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

नेमकं घडलं काय ?

परभणीच्या पाथरी तालुक्यातील देवेगाव येथे सोमवारी एका लग्न सोहळ्याला आमदार संतोष बांगर यांनी हजेरी लावली. लग्न मंडपात बांगर यांचे आगमन होताच तेथे पहिल्यापासून उपस्थित असलेल्या ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय बंडू जाधव यांचे चरणस्पर्श करून बांगर यांनी हस्तांदोलन केले. परंतु त्याचवेळी तेथे उपस्थित कार्यकर्त्यांकडून `पन्नास खोके एकदम ओके`च्या घोषणा करण्यात आल्या. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. संतोष बांगर यांचा चेहराही यावेळी पाहण्यासारखा झाला होता.

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर व्हराडी मंडळी चांगलीच चिंतेत पडली. हे राजकीय व्यासपीठ नाही. लगीन घर आहे. लग्नात काही गोंधळ होऊ देऊ नका, असे आवाहन व्हराडी मंडळींनी कार्यकर्त्यांना केल्यानंतर मग ते शांत बसले. परंतु या प्रकारामुळे ५० खोके एकदम ओके चे फॅड लग्नसराई पर्यंत पोचलं हे मात्र नक्की….