हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्य सरकारने महिलांसाठी अनेक खास योजना आणल्या आहेत. यातील लाडकी बहीण योजना (Ladaki Bahin Yojana) आणि एसटी तिकिटात ५० टक्के सवलत या योजना सर्वात खास आहेत. परंतु आता या दोन्ही योजना बंद होण्याच्या मार्गावर आल्या आहेत. कारण की आता, एसटी महामंडळाला या सवलतीमुळे मोठा फटका बसला आहे. त्यामुळे ही सवलत बंद करण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.
एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमानिमित्त धाराशिव दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकारांनी महिलांच्या एसटी सवलतीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. महिलांना देण्यात आलेल्या ५० टक्के सवलतीमुळे एसटी महामंडळाला दररोज ३ कोटी रुपयांचा तोटा होत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे येथून पुढे कोणत्याही प्रवर्गाला एसटी प्रवासात नवीन सवलत दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारने यापूर्वीच महिलांसाठी ५० टक्के, तर ७५ वर्षांवरील नागरिकांसाठी एसटी प्रवासात सवलत लागू केली होती. मात्र, या सवलतींमुळे महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीवर मोठा परिणाम झाल्याचे सरनाईक यांनी सांगितले आहे. तसेच, सरनाईक यांनी म्हणले आहे की, “जर सातत्याने सवलतीच देत राहिलो, तर एसटी महामंडळ चालवणे कठीण होईल. त्यामुळे नवीन सवलती देण्याचा विचार करता येणार नाही,”
दरम्यान, आज सरनाईक यांनी तुळजापुरात सुरू असलेल्या मोफत हॉस्पिटल प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर हे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, धाराशिव जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने हे हॉस्पिटल महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. महत्वाचे म्हणजे, परिवहन मंत्री सरनाईक यांनी ५० टक्के सवलती बाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. तसेच, आता इथून पुढे महिलांना एसटीचा सवलतीने प्रवास करता येईल का नाही? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.