मराठी चित्रपट सृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा; तब्बल पाच मराठी चित्रपटांची‘इफ्फी’साठी निवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी। भारताच्या अधिकृत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) ‘इंडियन पॅनोरमा’ या विभागात पाच मराठी चित्रपटांची निवड झाली आहे. ५० वे वर्ष साजरे करणाऱ्या ‘इफ्फी’मध्ये शिवाजी लोटन-पाटील दिग्दर्शित ‘भोंगा’, सुजय डहाके दिग्दर्शित ‘तुझ्या आयला’, समीर विद्वांस दिग्दर्शित ‘आनंदी गोपाळ’, अनंत महादेवन दिग्दर्शित ‘माई घाट : क्राइम नंबर १०३|२००’, आदित्य राही आणि गायत्री पाटील दिग्दर्शित ‘फोटो प्रेम’ हे पाच मराठी चित्रपट दाखविण्यात येतील. दोन वर्षांपूर्वीच्या महोत्सवात नऊ, तर गेल्या वर्षी दोन मराठी चित्रपट निवडण्यात आले होते. या विभागात मल्याळम्, बंगाली, तमिळ, तेलुगू या भाषांतील चित्रपटांचा वरचष्मा यंदाही कायम आहे.

५० वा ‘इफ्फी’ २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान पणजी, गोवा येथे रंगणार आहे. केंद्र सरकारकडून आयोजित केला जाणारा एकमेव चित्रपट महोत्सव असल्याने ‘इफ्फी’चे वेगळे महत्त्व आहे. देशभरातील कलाकारांबरोबर दुसऱ्या देशांतील कलाकारही ‘इफ्फी’त आपला चित्रपट निवडला जावा, यासाठी प्रयत्नशील असतात. भारतातील समकालीन चित्रपटांचा आवाका जागतिक पातळीवर लक्षात यावा, या उद्देशासाठी ‘इंडियन पॅनोरमा’ हा विभाग ओळखला जातो. दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी या विभागासाठी निवडलेल्या चित्रपटांची यादी जाहीर केली आहे.

पॅनोरमा विभागात मराठीसह केरळमधील पनिया, हिंदी, तमिळ, बंगाली, मल्याळम, कन्नड, इरुला, खासी, गारो, आसाममधील पांगचेंपा, गुजराती, तेलुगू या भाषांतील २६ चित्रपटांची निवड झाली आहे. नॉन फिचर फ्लिम विभागात गणेश शेलार दिग्दर्शित ‘गढूळ’ या लघुपटासह १५ लघुपट व माहितीपट दाखवले जातील.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment