Tuesday, June 6, 2023

घरगुती वादातून भावाने बहिणीवर केले कोयत्याने वार

विरार : हॅलो महाराष्ट्र – विरार पश्चिम येथील भाजी मार्केट परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपी भावाने जुन्या वादातून आपल्या बहिणीवर कोयत्याने सपासप वार केले आहेत. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला असून तो मोठ्या प्रमाणात व्हयरल होत आहे. हि घटना 13 जानेवारी रोजी माया निवास याठिकाणी घडली आहे. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात आरोपी भावाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

राजू माया असे अटक करण्यात आलेल्या आरोपी भावाचे नाव आहे. तो विरार पश्चिम येथील भाजी मार्केट परिसरातील रहिवासी आहे. आरोपी भाऊ राजू माया याचा गेल्या काही दिवसांपासून आपल्या बहिणीसोबत वाद सुरु होता. राहत्या घराच्या भिंतीवरून त्यांच्यात मोठा वाद झाला होता. याच वादातून आरोपी राजू याने 13 जानेवारी रोजी आपली बहिणी स्मिता शहा यांच्या घरात घुसून त्यांच्यावर वार करत त्यांना जखमी केले. हि संपूर्ण थरारक घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

या घटनेचा जो व्हिडिओ समोर आला आहे त्यामध्ये आरोपी राजू माया कोयता घेऊन आपल्या बहिणीच्या घरात शिरताना दिसत आहे. हा आरोपी घरात शिरताच पुढच्याच क्षणात स्मिता यांच्या घराच्या आसपासच्या लोकांची हालचाल पाहायला मिळत आहे. आरोपी राजू हल्ला करून बाहेर आल्यानंतर एक महिला जखमी स्मिता शहा यांना कपड्यात गुंडाळून रुग्णालयात घेऊन जाताना दिसत आहे. जखमी स्मिता शहा यांना संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच विरार पोलिसांनी 55 वर्षीय आरोपी राजू माया याला अटक करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.