Saturday, January 28, 2023

मुख्याधिकाऱ्यांचा दणका ः महाबळेश्वरला सहलीला आलेल्या पर्यटकांना व हाॅटेल मालकांला 55 हजारांचा दंड 

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

जिल्हाबंदी आदेश झुगारून महाबळेश्वरच्या सहलीवर येणे मुंबई येथील पर्यटकांना चांगलेच महागात पडले आहे. पालिकेच्या विशेष पथकाने पर्यटकांना व पर्यटकांना आसरा देणाऱ्या हॉटेलवर दंडात्मक कारवाई करून 55 हजाराचा दंड शुक्रवारी वसुल केला. पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या या धाडसी कारवाईचे शहरातुन चांगलेच कौतुक केले जात आहे.

- Advertisement -

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकाने राज्यात लॉकडाउन जाहीर केला आहे. राज्य सरकारच्या आदेशा नुसार प्रत्येक जिल्हयाच्या सिमा बंद करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक कामासाठीच जिल्हा ओलांडण्याची मुभा दिली जात आहे. परंतु सहलीसाठी जिल्हा बंदी मोडणे मुंबईतील पर्यटकांना चांगलेच महागात पडले आहे. मुंबईच्या पर्यटकांनी लॉकडाउन जाहीर झाल्या नंतर महाबळेश्वरच्या सहलीचा बेत आखला. महाबळेश्वर येथील हॉटेल लि मेरिडीयन मधील रूम ऑनलाईन बुक केल्या. पर्यटक शुक्रवारी अनेक जिल्हयाच्या सिमा ओलांडुन महाबळेश्वरात दाखल झाले. सायंकाळी पर्यटक येथील नाक्यावर आले असता, त्यांनी हॉटेल बुकिंग असल्याचे सांगुन शहरात प्रवेश केला. पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांना ही खबर मिळाली. त्यांनी तातडीने पर्यटकांच्या शोधासाठी पथक रवाना केले.

या विशेष पथकाने पर्यटकांची एक गाडी येथील छ. शिवाजी महाराज चौकात पकडली. तर, इतर दोन गाडया हॉटेलच्या प्रवेश व्दारावर पकडल्या. अधिक चौकशी केली असता पर्यटकांनी जिल्हाबंदी आदेश मोडल्याचे पथकातील अधिकारी यांच्या लक्षात आले. याबाबत पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांना सर्व हकिकत सांगितली. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार विशेष पथकाने पर्यटकांच्या प्रत्येक वाहनास दहा हजार तर, या पर्यटकांना हॉटेलमध्ये प्रवेश दिल्याबद्द्ल हॉटेल व्यवस्थापनास 25 हजार रूपये दंड आकारला. या कारवाईत विशेष पथकाने एकूण 55 हजाराचा दंड वसुल केला. पालिकेच्या मुख्याधिकारी यांनी केलेल्या या धाडसी कारवाईचे शहरातुन कौतुक केले जात आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group