युपीएससी परीक्षेला 57 टक्के ‘भावी अधिकाऱ्यांची’ दांडी

औरंगाबाद – केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससीची परीक्षा आज औरंगाबाद शहरातील 47 केंद्रांवर पार पडली. मात्र या परिक्षेला तब्बल 57 टक्के भावी अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे.

आज औरंगाबाद शहरात 47 केंद्रांवर नियमित वेळेवर यूपीएससीची परीक्षा सुरू झाली. या परीक्षेला तब्बल 57 टक्के विद्यार्थी अनुपस्थित असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी प्रमोद मुळे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील 47 केंद्रांवर आज सकाळी नऊ वाजून 30 मिनिटांनी परीक्षेला प्रारंभ झाला. या परीक्षेसाठी 1 हजार 989 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. परीक्षा केंद्रांवर कडक बंदोबस्त लावण्यात आला होता. परीक्षेसाठी 14 हजार 504 उमेदवार बसले होते.

परीक्षा कक्षात प्रवेश घेताना उमेदवारांचे प्रवेश प्रमाणपत्र व स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, निवडूक निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतीही एक ओळखपत्र तपासूनच परीक्षा केंद्रांवर प्रवेश दिला जात होता.