हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोठा गाजावाजा करूनही लोकसभेला भल्या भल्या प्रस्थापितांच्या जनतेनं बत्त्या गुल केल्या.. यातून महायुती अजून सावरलीही नसेल तोच विधानसभा तोंडावर आल्याने अनेक विद्यमान आमदारांना घाम फुटलाय… विशेष म्हणजे राज्यातील ट्रीपल इंजिन सरकारच्या सात मंत्र्यांची आमदारकी तरी वाचेल का? अशी परिस्थिती आहे … हे बिग बी सात मंत्री कोण आहेत? त्यांना मतदारसंघात पराभवाची धूळ चारणारे महाविकास आघाडीचे सात शिलेदार कोण असू शकतील? त्याचाच हा आढावा ..
मोठा गाजावाजा करूनही लोकसभेला भल्या भल्या प्रस्थापितांच्या जनतेनं बत्त्या गुल केल्या.. यातून महायुती अजून सावरलीही नसेल तोच विधानसभा तोंडावर आल्याने अनेक विद्यमान आमदारांना घाम फुटलाय… विशेष म्हणजे राज्यातील ट्रीपल इंजिन सरकारच्या सात मंत्र्यांची आमदारकी तरी वाचेल का? अशी परिस्थिती आहे … हे बिग बी सात मंत्री कोण आहेत? त्यांना मतदारसंघात पराभवाची धूळ चारणारे महाविकास आघाडीचे सात शिलेदार कोण असू शकतील? त्याचाच हा आढावा ..सध्या मंत्रीपदावर असणाऱ्या मात्र येणाऱ्या विधानसभेला डेंजर झोनमध्ये असणाऱ्या या सात मंत्र्यात पहिला नंबर लागतो तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा…
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बारामती कुणाची? याचा फैसला झाला तो लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभेला अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा सुप्रियाताईंनी धुव्वा उडवत दीड लाखाहून अधिकच लीड घेत बारामती आमचीच हे ठासून सांगितलं… सर्वात वाईट म्हणजे अजितदादा ज्या बारामती विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात त्याच मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना तब्बल 47 हजारांहून अधिकच लीड मिळालं… यावरून मुख्यमंत्री पदासाठी पक्षात फूट पाडून शिंदे फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या अजिदादांची येणाऱ्या विधानसभेला आमदारकीच धोक्यात आलीय… पवार कुटुंबात दोन भाग झाल्याने आता युगेंद्र पवार त्यांना बारामतीतून निर्णायक लढत देताना दिसतील.. युगेंद्र पवारांसाठी शरद पवारांकडून मतदारसंघात फिल्डींगही लावली जातेय… त्यामुळे गेल्या लोकसभेला मुलाचा… या लोकसभेला पत्नीचा… पराभव झाल्यानंतर आता येणाऱ्या आमदारकीला बारामतीतूनच पराभवाची टांगती तलवार अजितदादांच्या डोक्यावर असल्याचं पाहायला मिळतंय ..
यातले दुसरे मंत्रिसाहेव आहेत ते देवेंद्र फडणवीस… होय.. जे राज्याच्या राजकारणाला आणि भाजप पक्षाला दिशा दाखवण्याचं काम करतात त्याच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर दक्षिण पश्चिमचा मतदारसंघ डेंजर झोनमध्ये आलाय… सलग पाच वेळा फडणवीस या मतदारसंघातून मोठ्या दिमाखात निवडून येत असले तरी सध्याची परिस्थिती वेगळी आहे… लोकसभा निवडणुकीत विदर्भात भाजपने चांगलाच मार खाल्लाय… हक्काच्या बालेकिल्ल्यातच नितीन गडकरी यांना खासदारकीला अवघं 33 हजारांचंच निसटत लीड मिळालं… त्यामुळे भाजपला डेमेज करायचं असेल तर फडणवीसांना मतदारसंघातच रोखण्याचा डाव विदर्भातील काँग्रेस नेत्यांकडून केला जाऊ शकतो… काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, नागपूर मतदारसंघातील काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील केदार तसेच विकास ठाकरे यांनी तगडा उमेदवार मैदानात उतरवला तर फडणवीसांना मतदारसंघात गुलाल उधळण्यासाठी यंदा बरीच धडपड करावी लागेल, असं चित्र आहे…
मंत्र्यांच्या यादीतील तिसरं नाव येतं ते शंभूराज देसाई यांचं… मुख्यमंत्री शिंदे यांचे राईट हॅण्ड म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते मंत्री शंभूराज देसाई यांचा पाटण मतदारसंघही यंदा काठावर आलाय… . या मतदारसंघात देसाई गट विरूद्ध पाटणकर गट हे पारंपारिक प्रतिस्पर्धी मानले जातात… सरकारमध्ये राज्य उत्पादन शुल्क मंत्री तसेच साताऱ्याचे पालकमंत्रीदेखील असणाऱ्या देसाईंनी मतदारसंघात मोठा निधी आणलाय…. परंतु त्याचवेळी पाटणकर यांनी नगरपालिका जिंकत शंभुराज देसाईंना धक्का दिलाय… तसेच जिल्हा बँकेतही शंभुराज देसाईंचा पराभव केलाय… महाविद्यालय तसेच येऊ घातलेल्या शुगरकेन प्रकल्पातून त्यांनी अर्थकारणावर लक्ष केंद्रीत केलय… त्यामुळे यंदा शंभुराज देसाईंपुढे पाटणकरांचे तगडे आव्हान असणारय… यातच पक्षफुटीनंतर शंभुराज देसाईंनी शिंदे गटाची साथ दिल्याने ते उद्धव ठाकरेंच्या ते रडारवर आहेत. तसेच आपल्या विश्वासू उमेदवाराला ताकद देण्यासाठी शरद पवारही मैदानात उतरणार हे निश्चित झालंय… थोडक्यात शंभूराज देसाई यांची आमदारकीला ठाकरे – पवार चांगली कोंडी करणार असं दिसतंय…
आता येऊयात छगन भुजबळ यांच्याकडे… राष्ट्रवादीच्या फुटीत छगन भुजबळ यांनी अजितदादांना पाठिंबा दिला.. नुसता पाठिंबाच नाही तर त्यांनी जाहीर सभेतून शरद पवारांच्या विरोधात आक्रमक भाषणं केली यामुळे ते आता शरद पवारांच्याही चांगलेच रडावर आलेत… येवला मतदारसंघाचा इतिहास पाहता तो कायमच शरद पवारांसोबत राहिलाय…. याशिवाय मनोज जरांगे पाटील यांना अंगावर घेणेही भुजबळांना महागात पडू शकते. मराठा आरक्षणविरोधी भुमिकेमुळे भुजबळांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते. मनोज जरांगे पाटील यांनी तर छगन भुजबळांना येवला मतदारसंघात पाडणारंच, अशी थेट भिडण्याची भाषा बोलून दाखवलीय… त्यामुळे येवल्यात मनोज जरांगे फॅक्टर प्लस शरद पवार ही गोळाबेरीज आमदारकीला भुजबळांच्या अंगलट येऊ शकते…
या यादीतल्या पाचव्या मंत्र्याचं नाव आहे दादा भुसे यांचं… सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांच्यासाठी आमदारकीचं घोडे मैदान चांगलंच कठीणय… बंडू बच्छाव यंदा त्यांना मालेगाव मध्य मध्ये दादा भुसे यांना कडवं आव्हान उभं करू शकतात… त्यात ठाकरे गटाच्या अद्वय हिरे यांनी भूसेंना काहीही झालं तरी पाडणारच, असा प्रण केल्याने भुसेंच्या विरोधातील राजकारणात हिरे महत्वाची भूमिका बजावू शकतात… भुसे यांच्या विरोधातील अँटी इनकबन्सी, शिवसेनेची विभागलेली ताकद, विरोधकांनी दाखवलेली एकजूट यामुळे दादा भुसे यांना आमदारकी भलतीच जड जाणार असं दिसंतय…
सहावे मंत्री आहेत चंद्रकांत दादा पाटील…. राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघावर भाजपचेच माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दावा केल्यानं पक्षांतर्गतच विरोधाला चंद्रकांत पाटील. यांना समोर जावं लागतंय… बालवडकर यांनी कोथरूड भागात जनसंपर्क कार्यालय थाटले असून शहरात होम मिनिस्टर, लाडकी बहीण योजनेची माहिती सांगणारे रथ फिरवत मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. यामुळे येणाऱ्या काळात भाजपात कोथरूडच्या जागेवरून बंडाळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं झाल्यास महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पथ्यावर ही बंडाळी पडली तर चंद्रकांत दादा यांची आमदारकीची वाट सध्या तरी बिकट दिसतेय…
या यादितले सातवे आणि शेवटचे मंत्री महोदय आहेत विजयकुमार गावित…. आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्यासाठी यंदा आमदारकीचे मैदान वाटतं तितकं सोप्प नाहीये… नंदुरबार जिल्ह्यावर अनेक वर्षांपासून गावित परिवाराचं वर्चस्व आहे… परंतु या वर्चस्वाला खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकीपासून हादरे बसण्यास सुरुवात झाली… माजी खासदार हिना गावित लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आता आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची दुसरी मुलगी सुप्रिया गावित यांचं जिल्हा परिषद अध्यक्षपददेखील धोक्यात आलय… जिल्ह्यातील संपूर्ण सत्ताकेंद्रे गावित परिवाराकडे एकवटल्याने त्यांच्याविरोधात स्वपक्षातील अनेकजण नाराज आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत या नाराज मंडळींनी उघडपणे काँग्रेस उमेदवाराची साथ दिली होती. हीच परिस्थिती विधानसभा निवडणुकीत कायम राहिल्यास विजयकुमार गावित यांची आमदारकी सर्वात जास्त डेंजर झोनमध्ये आहे, असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही…