८ कोटी प्रवासी मजुरांना २ महिने मिळणार मोफत धान्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटादरम्यान जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. ‘स्वावलंबी भारत’ पॅकेजविषयी आज दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रवासी मजुरांना दिलासा देणारी घोषणा केली आहे.

देशातील ८ कोटी मजुरांना, जे दुसऱ्या राज्यातून स्वतःच्या राज्यात परतले आहेत त्यांना पुढील २ महिन्यांसाठी ५ किलो गहू आणि तांदूळ मोफत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारतर्फे देण्यात आला आहे. ही घोषणा प्रति व्यक्तीसाठी करण्यात आली असून याची अंमलबजावणी राज्य सरकारांनी करावी असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. या योजनेसाठी ३५०० करोड रुपयांची तरतूद केल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. यासोबतच केंद्रानं दैनंदिन कामगारांना देण्यात येणारं दिवसाचं मानधन १८२ रुपयांवरून २०२ रुपयांवर नेण्यात आल्याचं सीतारामन यांनी स्पष्ट केलं. १ लाख ८७ हजार ग्रामपंचायतीद्वारे २ कोटी ३३ लाख कामगारांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेद्वारे काम देण्याचं सीतारामन यांनी स्पष्ट केलं.

रात्रीच्या वेळी काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन वेगळे नियम लागू करणार असल्याचं यावेळी अर्थमंत्र्यांनी सांगितलं. प्रवासी मजूर आणि शहरी गरीब मजुरांसाठी कमीत कमी खर्चात राहता यावं यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील असून कमी भाडं असेल अशी घरं प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी उद्योगपती, राज्य सरकारने जागा उपलब्ध करून द्यावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत. लघु कर्ज घेणाऱ्या आणि त्याची वेळेत परतफेड करणाऱ्या लोकांसाठी व्याजात २% सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुद्रा शिशु कर्ज घेणाऱ्या लोकांना १ लाख ६२ हजार कोटी रुपयांच्या थकीत कर्जाच्या व्याजात २% कपात करुन हे १५०० कोटी रूपये माफ करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.

राज्यांतर्गत मजुरांना हालचाल करता यावी, त्यांच्या आरोग्यासंदर्भातही काम करता यावं यासाठी प्रयत्नशील असल्याचं सीतारामन पुढे म्हणाल्या. जे कामगार घातक वातावरणाच्या ठिकाणी काम करतात त्या सर्वांना वाढीव ESI देण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. मार्च आणि एप्रिल महिन्यात जवळपास ६३ लाख कर्जमंजुरी देण्यात आल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. कामगार कायद्याचा वापर करुन कमीत कमी वेतनही सन्मानजनक असावं यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं अर्थमंत्र्यांकडून सांगण्यात आलं. कामगारांच्या आरोग्याविषयी सरकार सजग असून त्यांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करण्यात येईल असंही आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं.

स्थलांतरित मजूर, गरीब, फेरीवाले, छोट्या प्रमाणात शेती करणारे शेतकरी यांच्यासाठी घोषणा होणार आहेत असं निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांसाठी आजच दोनच घोषणा असल्या तरीही पुढेही त्यांच्यासाठी घोषणा असणार आहेत. कुणीही मोदी सरकार शेतकऱ्यांना विसरलं असं म्हणू नये असंही निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच स्पष्ट केलं. गरीबांच्या कल्याणासाठीच हे सरकार आहे. तसंच गरीब कल्याण योजनेतूनही स्थलांतरीत मजुरांना मदत देण्यात येईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment