Satara News : दुर्गादेवीच्या विसर्जन मिरवणुकीत जनरेटरच्या पेट्रोल पाईपचा स्फोट, 8 जण गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| दुर्गादेवीच्या मिरवणुकी दरम्यान ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये असलेल्या जनरेटरच्या पाईपचा भीषण स्फोट झाल्याची घटना महाबळेश्वर येथे मंगळवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत आठ मुले आणि मुली भाजून गंभीर जखमी झाली असून त्यांना तातडीने साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, महाबळेश्वरातील दुर्गा उत्सव समिती कोळी आळी येथे दुर्गा देवीची विसर्जन मिरवणूक सुरू होती. मिरवणूक कोळी आळी मध्ये दिलीप रिंगे यांच्या घरासमोर आली असताना जनरेटरची पेट्रोलचा पाईपला गळती लागली आणि जनरेटरने पेट घेतला. या आगीत दुर्गा देवीच्या मूर्तिजवळ बसलेली चार ते सात वयोगटातील सात ते आठ मुले भाजली आहेत. मुलांच्या अंगावरील सर्व कपडे जळाली आहेत.

सर्व जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्या नंतर सर्व जखमी मुलांना पुढील उपचारासाठी सातारा येथील वेदांत हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आले आहे. या घटनेची तहसीलदार तेजस्विनी पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून माहिती घेतली. त्याच प्रमाणे सातारा येथील डॉक्टरांशी त्यांनी संपर्क साधून सूचना केल्या आहेत सध्या सर्व मुले सातारा येथील रुग्णालयात पोहचली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

माजी नगरसेवक संतोष आबा शिंदे हे स्वतः जखमी मुलांसोबत असून सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. प्रांताधिकारी राजेंद्र कुमार जाधव यांनी देखील या घटनेची माहिती घेतली असून तेही सातारा येथील रुग्णालयाच्या संपर्कात आहेत.जखमीना योग्य व तातडीने उपचार मिळावेत यासाठी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी हे रुग्णालयात पोहचले आहेत. तसेच पोलीस अधिक्षक समीर शेख डिवायएसपी भालचिम सातारा येथिल रुग्णालयात जखमींची भेट घेण्यासाठी धाव घेतली.

सर्व मुले व मुली आठ ते दहा वयोगटातील आहेत. जखमी झालेल्या सर्व मुलांना वाहनाने तातडीने साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर दुर्गा देवीची मिरवणूक साध्या पद्धतीने काढण्याचा निर्णय दुर्गा उत्सव समितीने घेतला आहे. या घटनेमुळे महाबळेश्वरात प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे. या घटनेची रात्री उशिरापर्यंत महाबळेश्वर पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.