मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत निवड झाल्या नंतर देखील हाती आलेली शासकीय नोकरी गमावण्याची वेळ राज्यातील ८३३ पदवीधर इंजिनिअर्स वर आली आहे. परिवहन विभागाच्या वतीने सहायक मोटर वाहन निरीक्षक पदासाठी झालेली भरती उच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे हे इंजिनिअर्स अडचणीत आले आहेत. या सगळ्या अडचणीतून मार्ग निघावा न्याय मिळावा यासाठी या सर्व उमेदवारांनी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची कृष्ण कुंज या निवासस्थानी आज भेट घेतली.
राज ठाकरे यांनी सदरील विषय या उमेदवारांकडून समजून घेतला. शिवाय या सगळ्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचीत करून आपणास न्याय मिळवून देणार असे आश्वासन राज ठाकरे यांनी या उमेदवारांना दिले. राज ठाकरे यांच्या कडून मिळालेल्या या भक्कम आधार आणि आश्वासना मुळे या उमेदवारांनी राज ठाकरे यांचे आभार मानले.
सहायक मोटर वाहक निरीक्षक पदासाठी पूर्वी केंद्र सरकारचे निकष लागू होते. जड मोटर वाहन चालविण्याची परवाना आणि सरकारी गँरेंज मधील कामाचा अनुभव असे निकष ठरविले होते. मात्र हे निकष २०१६ मध्ये बदलण्यात आले. या दोन्ही अटी राज्य सरकारने बदलून नवे निकष लावले. त्या आधारे जाहिरात देऊन भरती प्रक्रिया राबविली गेली. मात्र असे नियम बदलविण्यास कोर्टात आक्षेप घेतला गेला. पूर्वीच्या निकषांमुळे शासनाला आवश्यक त्या संख्येने उमेदवार मिळत नव्हते. तसेच खोटी प्रमाणपत्रे आणण्याचे प्रकार उघडकीस आले होते.ते थांबविण्यासाठी शासनाने नियमा मध्ये बदल केला होता. असे बदल करण्याची गरज का भासली हे शासना तर्फे कोर्टात योग्य प्रकारे मांडले गेले नाही. त्यामुळे केवळ याचिका कर्त्याची बाजूच कोर्टा पुढे आली. राज्य सरकारने उत्तम वकील न देता कनिष्ठ कनिष्ठ वकीलावर ही जबाबदारी सोपवली.या सगळ्या प्रकारामुळे कोर्टाचा निर्णय शासना विरोधात गेला असल्याचे इंजिनीअर्सचे म्हणणे आहे.
या उमेदवारांची राज ठाकरे यांच्या सोबतची ही भेट महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष महेश जाधव आणि महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे चिटणीस सुधीर नवले यांच्या प्रयत्ना मुळे घडून आली.